आघाडी फुटणार नाही; समान कार्यक्रमात कारण ‘तो’ विषय नव्हताच! नाना पटोले

0

महाविकास आघाडीच्या समान कार्यक्रमात सावरकर हा विषय नव्हताच. सावरकारांवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विचार वेगवेगळे आहेत. काँग्रसने कधी विचारांशी तडजोड केली नाही, असे सांगून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्यावर आघाडी फुटण्याची शक्यता फेटाळून लावली. सावरकर मुद्यावर शिवसेनेने रोखठोक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे सांगून राहुल गांधी यांना इशारा दिला. त्यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचणे सुरू केले आहे. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या आघाडीतून बाहेर पडा, हिंमत दाखवा असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. सध्या लोकशाही आणि संविधान वाचवणे, हीच मोठी लढाई आहे. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे. त्यात नवीन काहीच नाही. या मुद्याचा वापर करून भाजप महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहे. यात त्यांना यश येणार नाही.

राहुल गांधी यांनी चोरांना चोर म्हटले आहे, तर चुकले कुठे? ते माफी मागण्यास तयार नसल्याने भाजप सावरकर यांचा विषय काढून जनतेची दिशाभूल करीत आहेत. अदानी व त्यांचे घोटाळे या मुद्यापासून पळ काढण्यासाठी भाजपचा सर्व खटाटोप सुरू आहे. मात्र काँग्रेस या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यावर ठाम असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशातील जनतेची सहानुभूती राहुल गांधी आणि कॉंग्रेससोबत आहे, असे वाटू लागले होते. पण राहुल गांधी यांनी पुन्हा सावरकरांचा विरोध केल्यामुळे ती कमी झाली, असे माहितगारांचे म्हणणे आहे. शिवसेनेसोबत महाराष्ट्रात रहायचे असेल आणि आगामी निवडणुका लढायच्या असतील, तर सावरकरांचा विरोध करून चालणार नाही, असेही राजकीय जाणकार सांगतात. आता यावर कॉंग्रेस काय भूमिका घेते, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.