पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूडचे शिल्पकार माजी कृषिमंत्री शशिकांत भाऊ सुतार यांचे सुपुत्र शिवसेनेचे ( ठाकरे) माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी आपला सत्तेत राहण्याचा वारसा हक्क टिकवण्यासाठी आज भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला असला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने दगडी विरोधकांची फळी फुटल्याने प्रभाग क्रमांक 31 मधील विजयाची गणिते सुकर होण्यास मदत होणार आहे. कोथरूड हा पूर्वी शिवसेनेचा ताब्यात असलेला बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाने अत्यंत चालाखीने वर्चस्वाखाली आणला परंतु सध्या देश आणि राज्य पातळीवरील राजकारणामुळे स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचा अभाव लक्षात घेऊन आज घेण्यात आलेला पक्षप्रवेश यशस्वी झाल्याने अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि मानाचे असलेल्या प्रभाग 31 मध्ये विजयाची गणिते सुखर होण्यास मदत होणार आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात अत्यंत सुकर समजल्या जाणाऱ्या प्रभाग 31 ची रचना झाल्यानंतर सर्वांनाच हा प्रभाग भारतीय जनता पक्ष सहज विजयी करेल असे वाटत असतानाच विरोधकांची अशी मोट बनली की भारतीय जनता पक्षासाठी ती आगामी काळातील डोकेदुखीवर ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. चाणक्ष भारतीय जनता पक्षाने ही अडसर ओळखून विरोधकांची गणित जुळण्याआधीच हज्जा भाजपात सामील करून प्रभागाची गणिते सुकर करण्याचे काम केले.






पुणे शहरामध्ये सर्वात प्रथम मिळालेली भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष दिवस-रात्र कष्ट करत असून कोणतेही तत्त्व धोरण किंवा विचारधारा याचा विचार न करता विरोधकांचे बालेकिल्ले असलेल्या प्रभागातील निवडक चेहऱ्यांना भाजप वाशी करून सत्तेची गणिते जुळवण्याचे प्रयत्न करत आहेत. सत्ता कायम ठेवण्यासाठी होणाऱ्याबीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देेण्यात आले आहेत. त्यानंतर कोथरूडमधील शिवसेनेलाही ( ठाकरे) भाजपने खिंडार पाडले आहे. शिवसेनेचे कोथरूडचे माजी नगरसेवक , गटनेते पृथ्वीराज सुतार तसेच येरवड्यातील माजी नगरसेवक संजय भोसले यांनी भाजपमध्ये मंगळवारी प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोथरूडमधील राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपच्या काही निष्ठावंताकडून नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांनी या प्रवेशेच्या वेळी शिवसेनेचे तोंड भरून कौतुक केले असले तरीसुद्धा खरी अडसर ही विरोधकांची मोट जुळू नये हीच राहिली आहे. मुळात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान संधी न मिळाल्याने शिल्पकार घराणे पक्षापासून जराशी फारकत घेऊनच वागत होते. त्यातच नवी ठाकरे बंधूंची युती या प्रभागात यश देऊ शकेल की नाही याची साशंक स्थिती असल्यानेच दोघांच्याही गरजापुरतीसाठी आजचा हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाला या प्रभागामध्ये सक्षम पुरुष चेहऱ्याची उणीव भासत असतानाच विजयाची शाश्वती नसलेल मोठं नाव मिळाले.
कोथरूड भाजपचा हा अलीकडेच बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजप नगरसेवकांचे प्राबल्य असूनही शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी अत्यंत बिकट 3:1 अशी स्थिती असतानाही प्रभावी काम करून प्रभागातील नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. महापौर (सध्या केंद्रीय राज्यमंत्री) असे मानाचे पद या प्रभागात असतानाही विरोधातील मोकाटे शिंदे आणि सुतार या त्रिकुटाचा अडसर भाजपला वाटत होते. यापैकी माजी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांना पक्षात प्रवेश दिल्याने येथील राजकीय गणितेही बदलणार आहेत. सुतार यांना प्रवेश दिल्याने भाजपमधील इच्छुकांसह निष्ठावंतामध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. त्याचे पडसाद बंडखोरीतही उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी शिवसेनेबरोबर यापूर्वी काम केले आहे. दोन्ही पक्षात हिंदुुत्वाचा धागा कायम आहे, असे धीरज घाटे यांनी यावेळी सांगितले. हे दोन्ही नेते गेली अनेक वर्ष पुण्याच्या सामाजिक जीवनात काम करणारे आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपची युती झाली तेव्हा पासून हे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करत होते. यापुढेही हिंदुत्वाच्या मुद्यावर जर काम करायचे असेल तर, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे याची जाणीव झाल्यानेच त्यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. त्याला भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला.
या दोन्ही नेत्यांनी आपापल्या प्रभागात उत्तम काम केले आहे, अशी भूमिका मोहोळ यांनी मांडली. भाजप सर्वात मोठी जनसंघटना आहे. पक्ष विस्ताराबरोबरच पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी प्रवेश दिले जात आहेत. प्रवेश दिला म्हणजे उमेदवारी मिळेल असे नाही. येत्या काळात सर्व चित्र स्पष्ट होईल.
– मुरलीधर मोहोळ , केंद्रीय सहकार राज्यमंत्री













