राज्यात महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली असून, 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आचारसंहिता लागू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, आपल्या बालेकिल्ल्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला थेट आव्हान देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या रडारवर भाजपसह शिंदे यांचा पक्ष देखील असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पक्षातील खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुत्राविरोधात निवडणूक लढण्यासाठी अजित पवारांनी एक मातब्बर नेता पक्षात घेतला आहे.






मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस विरोधात आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करताच अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मी माझं सर्वस्व पणाला लावेल पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकूनच दाखवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर अजित पवार झपाटून कामाला लागले असून गेले दोन दिवस अजित पवारांनी बैठकीचा धडाका लावला आहे.
बैठकांसह दादांनी भाजप आणि इतर महाविकास आघाडीच्या पक्षांना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. मोठ मोठे पक्षप्रवेश अजित पवार घडवून आणताना पाहायला मिळत आहेत. यात माजी नगरसेविका सीमा सावळे, अश्विनी जाधव, संतोष जाधव, शिवसेनेच्या रुपाली आल्हाट, नेताजी काशीड, साधना काशीड, माजी नगरसेवक प्रमोद कुटे आणि तुषार सहाणे यांचा समावेश आहे.
खास करून सीमा सावळे यांचा प्रवेश भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. त्या तीन वेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका राहिल्या असून, काही काळ स्थायी समितीच्या अध्यक्षाही होत्या. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपसाठी मोठा झटका ठरला आहे.
सीमा सावळे यांच्यानंतर आणखीन एक मोठा प्रवेश दादांनी घडवून आणला आहे. तो म्हणजे ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक सचिन भोसले यांचा. गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मध्ये एससी प्रवर्गातून विजयी झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांच्या विरोधात उमेदवारीचा शब्द पक्षाकडून घेतल्यानंतर पक्ष प्रवेश केल्याचे भोसले यांनी सांगितले. तीन टर्म शिंदे गटाचे खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे खासदारांच्या पुत्राशी दोन हात करताना मोठी ताकद सोबत असणं आवश्यक असल्याने अजित पवारांच्या पक्षांमध्ये भोसले यांनी प्रवेश केला असल्याचे सांगितले जात आहे. भोसले यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसलात असून त्या उलट श्रीरंग बारणे यांच्या विरोधात मोठा आव्हान निर्माण झाला आहे.













