पुण्याचा पेच आज मुंबईत सुटणार! थेट यांच्या दरबारी खलबतं; कोथरूड कसब्यात मोठ्या बंडखोरीची टांगती तलवार इच्छुकांच्या रांगा

0

पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होऊनही महापालिका निवडणुकीसाठी युती आणि उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आज, बुधवारी पुन्हा मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीकडे पुण्यातील सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोथरूडमध्ये इच्छुकांच्या रांगा

पुणे शहरात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. विशेषतः कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, पुणे कँटोमेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांनी शहरातील भाजप नेत्यांवर मोठा दबाव आणला आहे. कोथरूडमध्ये इच्छुकांच्या रांगा लागत असून, त्यांची समजूत काढताना नेत्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांमध्ये नाराजीही दिसून येत आहे.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’ सुरू असल्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे समजते. पुण्यातही अशाच प्रकारची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी नागपूर येथील निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली होती. आजच्या बैठकीतही हेच नेते असणार की आणखी स्थानिक नेते सहभागी होणार, याबाबत स्पष्टता नाही. मात्र सर्वांचे एकमत असलेल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर आहे. त्यामुळे वादग्रस्त जागांवर शेवटच्या दोन दिवसांतच एबी फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचे उमेदवार जाहीर होईपर्यंत थांबण्याची जुनी परंपरा यावेळीही पाळली जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

खडकवासला, वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघांतील महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. मात्र पर्वती, खडकवासला आणि कोथरूड येथील काही नेत्यांना तूर्त त्यांच्या पक्षातूनच निवडणूक लढू द्यावी, असा सल्ला फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जाते. या सर्व घडामोडींवर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?