बुद्धगया दि. ८ (रामदास धो. गमरे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जेष्ठ भन्ते आकाश लामा, भन्ते प्रज्ञशील महाथेरो, भन्ते धम्मशिखर, भन्ते धम्मतप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन रॅलीला बिहार पोलीस प्रशासनाने विरोध केल्याने बुद्धगया परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही रॅली काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी होती.






भिक्खू संघ, उपासक आणि विविध राज्यांतून आलेल्या बौद्ध अनुयायांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. पोलिस प्रशासनाकडून दोन ते तीन दिवसांपासून रॅली रोखण्याचा प्रयत्न, तसेच धरणास्थळी दबाव टाकल्याचा आरोप आयोजकांनी केला. तथापि, पोलिसांच्या विरोधाला न जुमानता रॅली काढण्यात आली.
रॅलीत सहभागी असलेल्या उपासक आणि भन्ते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो व पंचशील ध्वज घेऊन महाबोधी विहाराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ध्वज आणि फलक घेऊन प्रवेश करू नये, असा आग्रह पोलिसांनी धरला. अनेक मान्यवर भन्ते आणि ज्येष्ठ अनुयायांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मोठ्या संख्येने अनुयायी विहारात प्रवेश करून परिक्रमा, बुद्धवंदना आणि पूजापाठ करून अभिवादन विधी पार पाडण्यात आला.
या रॅलीचे नेतृत्व मा. आकाश लामा, भन्ते प्रज्ञशील महाथेरो, भन्ते धम्मशिखर आणि भन्ते धम्मतप यांनी केले. रॅलीनंतर जयप्रकाश उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी पुन्हा धरणास्थळी परतून अभिवादन सभा आयोजित केली. या सभेला महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या अनुयायांचा तसेच बौद्धजन पंचायत समितीचे गतप्रतिनिधी विजय तांबे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे व समितीचे सदस्य, सभासद यांचा मोठा सहभाग लाभला. दरम्यान, महाबोधी विहारात प्रवेशासाठी अधिकृत पास असूनही भन्ते बोधिधम्मा यांना विहारात प्रवेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोपूजेला पोलिसांनी विरोध केल्याची घटना समोर आली, तरी आम्ही बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या महाबोधी विहारात जाण्यासाठी आलो आहोत आम्ही इतर धर्माच्या मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, धर्मस्थळ, प्रार्थनास्थळ येथे अवैध जात नाही तरी बिहार पोलीस प्रशासनाचा ही वागणूक बरोबर नाही असे सर्वांनी नमूद करीत पोलिसांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. सध्या महाबोधी महाविहार परिसरात आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅंटिंग कार्यक्रम सुरू असून देश-विदेशातील भिक्खू, उपासक आणि समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
या संपूर्ण घटनांमुळे बिहार प्रशासन आणि बौद्ध अनुयायांमध्ये तणावाचे वातावरण कायम असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













