पुण्यात विमानतळ रस्त्यालगत ‘बॉम्ब’ सदृश जिलेटिनच्या काड्या, डेटोनेटर साहित्य आढळलं! परिसरात खळबळ

0

पुण्यातल्या टिंगरेनगर परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला जिलेटिन स्टिक्स आणि डेटोनेटर असलेली पिशवी सापडली. ही पिशवी एका महिला कचरा वेचकाला दिसली आणि तिने लगेच पोलिसांना माहिती दिली. विश्रांतवाडी पोलिसांसह बॉम्ब शोधक व विल्हेवाट लावणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पिशवी सुरक्षितरीत्या ताब्यात घेत परिसर काही काळासाठी बंदिस्त केला गेला.

तपासात माहिती समोर आली की, पिशवीतील विस्फोटक साहित्य जवळच्या बांधकाम साइटसाठी वापरण्यात येत होते. पोलिसांनी अंदाज लावला की, वाहतुकीदरम्यान किंवा कामाच्या ठिकाणी ही सामग्री निष्काळजीपणे टाकली गेली. या घटनेला गंभीर मानत पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी बांधकाम कंत्राटदार राहुल सुदाम वाजे (वय ३८) याला अटक करण्यात आली असून, साइटचे जमीनमालक किसन ज्ञानदेव दंडवते यांच्यावरही स्फोटक कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक मंगेश हांडे यांनी सांगितले की, “प्राथमिक तपासात ही स्फोटके बांधकामासाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अशा संवेदनशील वस्तू सार्वजनिक ठिकाणी सापडणे ही गंभीर बेपर्वाई असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.” पिशवी रस्त्यावर कशी आली आणि वाहतुकीत कोणती चूक झाली, याचा तपास विश्रांतवाडी पोलिसांकडून सुरू आहे.