बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक वळण आली असून तपासात संपूर्ण सहकार्य केल्याने सीआयडीच्या ताब्यात असलेल्या आरोपी वाल्मीक कराड याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देताचं शासकीय यंत्रणाही तात्काळ सक्रिय होत लगेच वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी संबंधित आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सध्या वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन्हीही गट टोकाचा विरोध करत असताना पोलीस यंत्रणेला मात्र जनभावनेचा आदर करत तपास पूर्ण करण्याचे ‘शिवधनुष्य’ पेलावे लागत आहे. यातील सातपैकी एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.






बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज पर्यंत ताब्यात असलेल्या सर्व आरोपींना मोका लावण्यात आला परंतु वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा आणि मकोका दाखल करण्यात न आल्याने मस्साजोग ग्रामस्थ, संतोष देशमुख यांचे बंधू, मुलीसह कुटुंबीयांनी सोमवारी गावातील पाण्याच्या दोन टाक्यांवर चढून आंदोलन केलं. तर आज वाल्मीक कराड यांना न्यायालयात हजर करण्याच्यापूर्वीच त्याच्या आईने पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन करत न्याय देण्याची भूमिका घेतल्याने या भागातील दोन्ही समुदायानी उग्र भूमिका घेतलेली असतानाच न्यायालयाने संबंधित आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे पुन्हा जनभावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांच्या वतीने लगोलग एसआयटी मार्फत मोका लावण्याची कारवाई केली करण्यात आली आहे. परंतु सीआयडीच्या ताब्यात असतानाच संबंधित आरोपीची पोलीस कस्टडी संपतात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने केज न्यायालयात मार्फत कोणत्या सूचना येतात याकडे सध्या लक्ष लागले आहे.
हत्येतील तपासाच्या संदर्भाने कुटुंबीयांना आवश्यक ती माहिती मिळत नसल्याचा आरोप करून संपूर्ण मस्साजोग ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेत आल्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा पोलीस कसे सोडवणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा पोलिसांनी पुरवणी जबाब घेतला असून त्यामध्ये करण्यात आलेल्या धक्कादायक आरोपांच्या पार्श्वभूमी वरती वाल्मीक कराड यांना कदाचित मोकाही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जबाबानुसारच तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्रपरवानाही बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकातील नऊ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी नवे सहा अधिकारी नियुक्त करण्यात आले. विशेष चौकशी पथकातील अधिकारी बदलताच या प्रकरणाने विशेष गती पकडल्यामुळे आगामी काळामध्ये जनभावना आणि रोज याचा विचार करता न्यायालयाच्या वतीने कदाचित पुन्हा 14 दिवसाची पोलीस कस्टडी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात मोठ्या चर्चेचा विषय आहे.











