ताम्हिणी घाटात धावत्या कारवर दगड पडल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. रायगड जिल्ह्यातल्या कोंडीथर इथं ही दुर्घटना घडली. गुरुवारी सकाळी कारने एक कुटुंब माणगावच्या दिशेनं निघालं होतं. त्यावेळी ताम्हिणी घाटात डोंगरावरून पडलेला दगड कारच्या सनरुफमधून थेट आत पडला. यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा मृत्यू झाला होता.






याबाबत मिळालेली माहिती अशी की, ताम्हिणी घाटात कोंडीथर गावाजवळ कारवर दगड पडला. हा दगड कारच्या सनरुफची काच फोडून थेट महिलेच्या डोक्यात पडल्यानं महिलेचा मृत्यू झाला. स्नेहल गुजराथी असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या पुण्याहून माणगावच्या दिशेने कुटुंबासोबत निघाल्या होत्या.
कोंडीथर गावच्या हद्दीत दरडीचा एक भाग आहे. या दरडीवरचे दगड अचानक खाली घसरले आणि ते कारवर आदळले. दगड इतक्या वेगात आदळले की कारच्या सनरुफमधून वेगानं आत घुसले. चालकाच्या शेजारी बसलेल्या स्नेहल यांच्या डोक्यात हा दगड आदळला.
स्नेहल यांच्या डोक्याला यामुळे गंभीर दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने मोदी क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे दरडीचा काही भाग कमकुवत झाला आहे. डोंगरावरचे दगड यामुळे खाली येऊन ही दुर्घटना घडली.












