आपल्यापासून राज्यघटनेला धोका नसल्याचे सांगतानाच तिने सत्तेमध्ये असलेल्यांकडून घेतले जाणारे अमानवीय निर्णय हाच खरा धोका असल्याचे म्हटले आहे. अल्बानियाच्या भाषेमध्ये ‘डायला’ या शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो. ‘डायला’ ही फक्त आभासी प्रतिमा असून ती ह्युमनॉइड रोबो नाही.






डायला तिची भूमिका स्पष्ट करताना म्हणाली, की ”मी इथे माणसाची जागा घेण्यासाठी नाही तर त्यांना मदत करण्यासाठी आली आहे. मी माणूस नसल्याने काहीजणांनी मला घटनाबाह्य ठरविले. पण एक गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे राज्यघटनेला यंत्रांचा धोका कधीच नव्हता. जे सत्तेत असून अमानवीय निर्णय घेतात त्यांच्यापासून खरा धोका आहे.” डायलाच्या व्हर्च्युअल अवताराला संसदेत भाषण करण्यासाठी खास पारंपरिक पोशाख घालण्यात आला होता.
एखाद्या देशामध्ये ‘एआय जनरेटेड’ मंत्र्याकडे (बॉट) एखादे खाते सोपविले जाण्याची ही पहिलीच वेळ असून मागील आठवड्यामध्ये पंतप्रधान इदी रामा यांनीच डायलाकडे मंत्रिपद सोपविले होते. या बॉटने आता काही घटनात्मक बाबींवर देखील चिंता व्यक्त केली. ”कायद्यामध्ये कर्तव्ये, जबाबदाऱ्या, पारदर्शकता आणि सर्वांना समान वागणूक आदी बाबींचा समावेश असतो. मानवाची मित्र या नात्याने मी ही मूल्ये जपेल याची हमी तुम्हाला देते. कदाचित मानवापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मी माझे कर्तव्य पार पाडेल,” असे डायलाने म्हटले आहे.
भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी बॉट
जनहितार्थ कामांसाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमधील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी अल्बानियाच्या पंतप्रधानांनी या ‘एआय बॉट’कडेच मंत्रिमंडळातील खाते सोपविण्याचा निर्णय घेतला होता. यंदा जानेवारी महिन्यामध्ये ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ म्हणून या ‘एआय’च्या वापराला सुरुवात करण्यात आली होती. लोकांना ‘इ- अल्बानिया’ या प्लॅटफॉर्मचा वापर कसा करायचा हे शिकविण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान भ्रष्टाचार ही अल्बानियातील सर्वांत मोठी समस्या आहे. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये १८० देशांच्या क्रमवारीमध्ये हा देश ८० व्या स्थानी आहे.
निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार हा पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आम्ही एआयचा वापर केला. एका उच्चविद्याविभूषित टीमसोबत आम्ही काम करत असून त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञांचा समावेश आहे. ‘एआय’वर आधारित व्हर्च्युअल असिस्टंटमुळे अर्ज करणाऱ्यांना आवश्यक सरकारी दस्तवेज सहजपणे ऑनलाइन उपलब्ध होऊ शकतील.
– इदी रामा, पंतप्रधान अल्बानिया
केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘एआय’ला राजकारणामध्ये आणले असून ‘बॉट’च्या माध्यमातून भ्रष्टाचार थांबविला जाऊ शकत नाही. मुळातच ‘एआय’चा वापर हा घटनाबाह्य असून सरकारनेच त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. शेवटी डायलावर कोण नियंत्रण ठेवणार. डेमोक्रॅटिक पक्ष याविरोधात न्यायालयामध्ये धाव घेईल.
– साली बेरिशा, विरोधी पक्ष नेत्या











