मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं आज बीडच्या नारायण गड येथे जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मनोज जरांगे यांनी भाषण केलं. मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात आपला प्लॅन बी देखील सांगितला. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे. पण तसं न झाल्यास काय करणार? याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर जरांगे यांचा प्लॅन बी तयार आहे. यावेळी जरांगे उपोषण करणार नसल्याचं म्हणाले आहेत. तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातून शहरात जाणारा भाजीपाला, दूध बंद करु, असा देखील प्लॅन तयार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. यामुळे सरकारसाठी हा मोठा इशारा आहे.






“आपण काळजी करु नका, मराठवाड्यातील सर्व मराठा समाज शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे. मी काही नुसतं भाषण करत नाही. तुम्हाला सिद्ध करुन दाखवले. याआधीदेखील म्हणत होते की, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देणार नाही. तुमच्या साक्षीने 3 कोटी मराठ्यांना आरक्षण दिलं की नाही? आता निघालेल्या जीआरमधून एक राहत नाही. आता काही जणं डोक्यातून काढून टाकायचं. त्यांना असं वाटतं की, आपण शेतात काम करतो म्हणजे आपल्याला डोकं नाही, असा त्यांचा गैरसमज आहे. तुला अक्कल होतं तर तू आतापर्यंत का आरक्षण मिळवून दिलं नाही?”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“आपली मुलं सुखी होतील यासाठी लढाई लढत राहायची. पण समाजाला मिळवून द्यायचं. आपण जे केलं ते वाया जावू दिलं नाही. तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटल्यावर. मग तुम्ही शंका घ्या. आपल्याला फसवलं तर फसवणारं सरकार आहे. आपण आपल्यात एकमेकांना कुणी फसवणार नाही. मला वाटलं असतं तर मी माझंच कुटुंब मोठं केलं असतं. समाज मोठा करायचा आहे. त्यासाठी झुंज सुरु आहे”, असं मनोज जरांगे यांनी सांगिलं.
“आपली नोंदच नव्हती. आता हैदराबाद गॅझेटची नोंद घेणार आहेत. नाही घेतलं तर त्यांना महाराष्ट्रच बंद करुन टाकू. फिरुच द्यायचं नाही. आपण काम करताना पुन्हा लढायची वेळ आली तरी हरकत नाही. कधी माणसाची हार होते? समाजाच्या स्वाभिमानाचा विचार नाही केला आणि स्वत:चा विचार केला तर समाज खचतो. तुमचा स्वाभिमान कमी होऊ देणार नाही. तुमची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. जितका अपमान करतील तितक्या ताकदीने मी लढतो. मी माझ्या समाजाची खाली मान होऊ देत नाही. एखादी गोष्ट एक-दोन महिने उशिरा मिळेल पण स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. मी समजाला टप्प्याटप्प्याला मिळवून देईन”, असं आश्वासन मनोज जरांगे यांनी दिलं.
“कायदा या पोरांनी आणि मी बनवला. येवल्यावाला तर कुणाकडेही जीआर घेऊन फिरत आहे. याचा अर्थ काय? असं विचारत आहे. तज्ज्ञाकडे जीआर घेऊन जातो आणि मला काही समजत नसल्याचं म्हणतो. म्हणजे नुसत्या गरिबाच्या पोराने एक कायदा बनवला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शनमध्ये आला. आम्ही चूक झाली तर आमचं दुरुस्त करु. आम्ही आमचं बघू”, असं जरांगे म्हणाले.
जरांगे यांचा मोठा इशारा
“आता हुकलं फिकलं तर आता आंदोलन किंवा उपोषण करायची गरज नाही. ह्यांना भाजीपाला, दूध द्यायचं नाही. मुंबईत तिथेच वाळू खा म्हणावं. खचायचं नाही. आपण दोन वर्षात भरपूर जणांना आरक्षण मिळवून दिलंय. मी तिथेच बोली करुन घेतली आहे की, चुकलं तर जीआरमध्ये बदल करुन द्यायचा. ते हो म्हणाले आहेत. याला म्हणतात मराठ्यांच्या गरिबाचा धसका”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं. तुम्ही म्हणाले हैदराबादचे गॅझेट लागू करु. त्यामुळे आता प्रमाणपत्र द्या. आरक्षण मिळेल. नाही मिळालं तर त्यांचं सगळं बंद होईल”, असा इशारा त्यांनी पुन्हा दिला.










