सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाची दिशा स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सगळेच कंबर कसून कामाला लागले आहेत. आता सत्तेत सत्ताधारी जरी एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता गाजवायचा जेव्हा विषय आला तेव्हा तुझं तु माझं मी असं म्हणत कुरघोडी अन् खेळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या अगोदर जाहीर झाले असल्यामुळे या निवडणुकांसाठी पूर्वतयारी किंवा प्रभावी भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था मानली जात असल्याने संपूर्ण राज्यासाठी स्वतंत्र अशी भाजप आपली रणनिती आखली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांबरोबरच पुरोगामी विचाराची स्वतंत्र वोट बँक प्रभावी असून या समुदायाला आपलेसे करण्यासाठी अजितदादाही प्रचंड सक्रिय झाल्या असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराच्या प्रत्येक चेहऱ्याला आपलेसे करण्यासाठी अजितदादा पवार जंग-जंग पछाडत आहेत. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर प्रवेशाची मोहीम सुरू झाल्यामुळे दोन्ही पक्षात इनकमिंगचा जोरदार धडाका सुरु झाला असला तरी सुद्धा यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे सध्या विधानसभेमध्ये ज्या विधानसभा मतदारसंघांमधून शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये किंवा विचारसरणी प्रबल असलेल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी प्रवेशांचा धूम धडाका करत असल्याने शिंदे मात्र अस्वस्थ आहेत.






भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रवेशामुळे शिंदेंसोबत त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील नवी अडचण लक्षात घेऊन वरिष्ठांच्या कानावर स्थानिक पातळीवरच्या घडामोडी पोहोचवण्यासाठीच शिंदेंनी दिल्ली गाठल्याचंही बोललं जात आहे. त्यातही सलग दोन वेळा कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट नाकारल्यामुळे ‘दिल्लीवारी’ अपयशी झाली आहे की काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अचानकपणे नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना भेटी देऊन त्यांच्या नाराजीला मोकळी करण्याचे काम केले आहे. गेल्या ८ दिवसात हा त्यांची दुसरा दिल्ली दौरा आहेत. वरवरचे कारण उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर NDA नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्या तरी या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली नाराजी स्पष्टपणे बोलण्याची शक्यता जास्त आहे. यावेळी एकनाथ शिंदे आपल्या खासदारांसह यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहांच्या भेटी घेणार आहेत. कदाचित महाराष्ट्रात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाची तक्रार शिंदे करू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे. एकीकडे संजय शिरसाट, संजय गायकवाडांच्या कारनाम्यांना वैतागलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रपक्षांच्या कारनाम्यांमुळे आणखी गोत्यात सापडले आहेत. कारण भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिंदेंच्या नेत्यांच्या मतदारसंघात मोठा प्रतिस्पर्धी उभा केला जात आहे. बड्या आणि महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश केले जात आहे. ज्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे शिंदे अस्वस्थ असल्यची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर झालेले पक्ष प्रवेश
सत्यजित सिंह पाटणकर
भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सत्यजितसिंह पाटणकर यांना आपल्याकडे घेत जून महिन्यात त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. भाजपचा साताऱ्यातील हा धक्का शरद पवारांपेक्षा शिंदेंच्या शंभुराज देसाईंना जास्त होता. कारण विधानसभेला सुद्धा शंभुराज देसाईंच्या विरोधात सत्यजित सिंह पाटणकर यांनी अपक्ष निवडणुक लढवली होती. शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर अशी झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये शंभूराज देसाईंनी बाजी मारली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती वेगळीच लढणार म्हटल्यावर इथे पाटणकर देसाईंना जड जाऊ शकतात. कारण पाटणच्या पंचायत समितीत पाटणकर गटाची सत्ता आहे. याचा फायदा भाजपला आगामी निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकरांच्या माध्यमातून शंभुराज देसाईंवर कुरघोडीचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
संजय जगताप
काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा गेल्या जुलै महिन्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या म्हणण्यानूसारच जगतापांची भाजपची वाट पकडली. हा धक्का काँग्रेससाठी मोठा ठरला. पण या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्या अडचणी मात्र वाढल्या. कारण शिवतारे आणि जगताप एकमेकांचे अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक राहिलेत. पुणे जिल्ह्यात भाजप आपलं वर्चस्व वाढवू पाहत असताना काही ठिकाणी त्यांना यश देखील मिळत आहे. पण पुरंदरमध्ये मित्र पक्ष शिवसेना असल्यानं विजय शिवतारेंच महायुतीचा चेहरा होते. त्यांना प्रतिस्पर्धी असा कोणता चेहरा नव्हता. पण जगतापांमुळे शिवतारेंच्या नांग्या आवळल्या जाऊ शकतात. जगतापांमुळे पुरंदर तालुक्यात भाजपला मोठे राजकीय बळ मिळू शकतं. पुरंदरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेत सत्तेच स्वप्न जगतापांमुळे पूर्ण होऊ शकतं.
पंडित पाटील
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी एप्रिल महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. पाटलांच्या घराण्यातील या फुटीमुळे शिंदेंच्या महेंद्र दळवींची मात्र कोंडी झाल्याचं पहायला मिळतं. कारण कोकणात लोकसभेपासूनच भाजप शिवसेनेला फारसं जुमानत नसल्याचं चित्र आहे. लोकसभा, विधानसभेत खास करून कोकणात तिकीट वाटपावरून शिवसेना आणि भाजपचे वाद अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे अलिबागमध्ये तरी शिंदेंच्या महेंद्र दळवींना शह देण्यासाठी पंडित पाटील भाजपचा चांगला चेहरा बनू शकतात. ज्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये पहायला मिळेल.
कैलास गोरंट्याल
कैलास गोरंट्याल यांनी नुकताच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. ते तीन वेळा आमदार आहेत. गोरंट्याल जालन्यात काँग्रेसचा मोठा चेहरा मानले जायचे. कारण जालन्यात कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांच्यातील राजकीय वैर चांगलीच माहिती आहेत. शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा ५० खोके एकदम ओके ही लाईन गोरंट्यान यांनीच सुचवली होती. पक्षाच्या निष्ठावंतांपैकी एक मानले जायचे. पण त्यांनीच भाजपात प्रवेश केल्यानं काँग्रेसची जिल्ह्यात मोठी हानी झाली. राजकीय समीकरण बदलली. गोरंट्यात काँग्रेसचे जुने नेते त्यात जालना काँग्रेसचा किल्ला होता. ज्याचा फायदा गोरंट्याल यांना झाला आणि आपलं वर्चस्व त्यांनी निर्माण केलं. कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा देखील राहिल्यात. त्यामुळे भाजपला गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश फायद्याचा ठरू शकतो.
पण भाजपने गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश करून घेत शिंदेंच्या खोतकरांसमोर मोठं आव्हान उभं केलं. कारण जालन्यात कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतरकर एकमेकांचे कट्ट्रर विरोधक. एकमेकांवरोधात निवडणुक लढवण्यापासून एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यापर्यंत गोरंट्याल विरुद्ध खोतकर वाद राज्यात राजकारणत चर्चेत असतो. आताही जेव्हा गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हाही त्यांच्यातील वितुष्ट समोर आलं. त्यांच्यातला वाद अक्षरश: त्यांच्या घरापर्यंत गेला. अशात गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाने अर्जुन खोतरकरांपुढे आव्हान आहे.
राजीव साबळे
रायगडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातली कट्टरता नव्यानं काय सांगायची गरज नाही. जिल्ह्यातला पालकमंत्री पदाचा वाद अक्षरश: दिल्लीपर्यंत गेला आहे. हा वाद सुरु असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. तटकरेंनी दोन् प्रतिस्पर्धी पुढ्यात उभं करून गोगावलेंची गोची केली. एक म्हणजे महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि दुसरं नाव म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे. या दोन्ही पक्षप्रवेशांमुळे तटकरे यांनी आपल्या दोन्ही मुलांची भविष्यातील आमदारकी सेफ केली.
राजीव साबळे रायगड जिल्हा परिषदेत निवडून आलेत. साबळे यांचा माणगाव नगरपंचायतीसह लोणेरे, निजामपूर, गोरेगाव, मोर्वा आणि इंदापूर या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात दांडगा जनसंपर्क असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाचही विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून यश मिळू शकते. गोगावलेंसोबत कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनाही शह देत त्यांचा कट्टर विरोधक सुधाकर घारे यांचाही पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना थेट रायगड जिल्हाध्यक्षपद देऊन टाकलं. गोगावले यांचे कट्टर विरोधक महाडच्या हनुमंत जगताप यांच्याकडे प्रदेश सरचिटणिस पदाची जबाबदारी दिली. मित्रपक्षाच्या या खेळीमुळे आता शिंदेंची चांगलीच कोंडी झाली. हीच कोंडी सुटावी म्हणून शिंदेंनी ८ दिवसात दोनदा दिल्ली गाठल्याचं बोललं जातं.











