पालकमंत्रिपद भाजप-सेनेच्या भांडणात आत्ता तिसरा भिडू?; मंत्रिमंडळात भुजबळांचं कमबॅक, आता राष्ट्रवादीचाही दावा

0
4

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळांचे मंगळवारी (दि. २०) मंत्रिमंडळात कमबॅक झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्याने या पदाची स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. शिवसेनेचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शीतयुद्धात आता भुजबळांचीही एंट्री झाली असून, अनुभवाचा दाखला देत, समर्थकांनी थेट पालकमंत्रिपदासाठी होर्डिंग वॉर सुरू केल्याने तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि नियोजन समितीवरील वर्चस्वासाठी महाजन, भुजबळ आणि भुसेंच्या चुरशीत आता कोण बाजी मारते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत गेल्या पाच महिन्यांपासून ओढाताण सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी १९ जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. परंतु, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले होते. शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला चोवीस तासांतच स्थगिती दिली होती. यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटाकडून या पदासाठी दावा केला गेला. त्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नावाचीही चर्चा झाली. त्यात कोकाटे यांचा दावा प्रबळ असतानाच शासकीय सदनिका घोटाळ्यात त्यांना शिक्षा झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे भुसे आणि महाजन यांच्यातच पालकमंत्रिपदाची स्पर्धा सुरू असताना आता भुजबळांच्या रुपाने तिसऱ्या भिडूची एंट्री झाली आहे. भुसे,महाजन आणि भुजबळांच्या स्पर्धेत नेमके कोणाला पालकमंत्रिपद मिळते याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

सिंहस्थासाठी भाजपला हवंय पालकमंत्रिपद

नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यानिमित्त हजारो कोटींचा निधी येणार असल्याने या निधीवर भाजपला कंट्रोल हवा आहे. तर भुजबळ यांनी या आधी कुंभमेळ्यावेळी पालकमंत्रिपद भूषविले आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा अनुभव आणि आधीच्या कुंभमेळा नियोजनातील सहभागावर भुजबळांकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. तर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी गिरीश महाजन हवे आहेत. नाशिकमधील मागील कुंभमेळ्याच्या वेळी गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री होते. त्यामुळे भाजप पुन्हा गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकत्व देण्यास उत्सुक असल्याने कोणाची लॉटरी लागते याकडे लक्ष लागून आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे