मुंबई : भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत सशस्त्रसंधीबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाच्या जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली. गेल्या आठवड्याभरातील घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेशी संवाद साधणार असल्याने अनेकांचं मोदींकडे लक्ष लागलेलं होतं. विशेष म्हणजे मोदी यांच्या भाषणाची वेळ देखील महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली होती. मोदी यांनी याआधी नोटाबंधी आणि लॉकडाऊनची घोषणा रात्री आठ वाजताच केली होती. त्यामुळे मोदी यांच्या आजच्या संबोधनाबाबत सस्पेन्स निर्माण झाला. यानंतर आता मोदी जनतेशी संवाद साधत आहेत.






“नमस्कार, आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिलं आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना, सशस्त्र बल आमच्या गुप्तचर यंत्रणा, वैज्ञानिक यांना प्रत्येक देशवासियांकडून सलाम करतो. आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असीम शौर्याचं प्रदर्शन केलं. मी त्यांच्या वीरतेला नमन करतो, त्यांचं धाडस, पराक्रम देशाच्या प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करतो”, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.
पहलगाम हल्ल्यावर मोदींचं भाष्य
“22 एप्रिलला पहलगामध्ये दहशतवाद्यांनी जो निष्ठुरपणा दाखवला होता त्याने देश आणि जगाला धक्का दिला होता. सुट्टी साजरा करणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या परिवारासमोर, मुलांसमोर अतिशय निर्घृणपणे मारुन टाकणं हे दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता, क्रूरता होती. देशाच्या सद्भावनेला तोडायचा घाणेरडा प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही घटना खूप मोठी होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, प्रत्येक समाज, प्रत्येक पक्ष एका स्वरमध्ये दहशतवादविरोधात कडक कारवाईसाठी उभे राहिले. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी आणि त्यांची संघटनेला जाणीव झाली आहे की, आमच्या माता, भगिणींच्या माथेवरील सिंदूर हटवण्याचे परिणाम काय होतात”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
‘दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की…’
“ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. हे देशाच्या कोटी कोटी भावनेचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे च्या रात्री उशिरा, 7 मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिलं आहे. भारताच्या सेनेने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो. पण देश जेव्हा एकजूट होतो. भारत प्रथमची भावनेत असतो, तेव्हा असे निर्णय घेतला जातो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.











