उष्णतेने भाजून काढल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. अंदमानजवळील समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून निकोबार बेटांवर रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सूनची चाल यंदा वेगवान होण्याची दाट शक्यता असून येत्या चार ते पाच दिवसांत मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्येही, दक्षिण अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यातही पावसाला पूरक असे हवामान तयार होत आहे. यामुळे विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मंगळवारी वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही ठिकाणी सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
सोमवारी कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर, तसेच विदर्भातील नागपूर, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती, परभणी, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, जळगाव, वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक, जेऊर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. धुळे, सोलापूर, धाराशिव आणि वाशीम येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे (३६.२-२४), धुळे (३८-२२.६), जळगाव (४०-२६.५),
जेऊर (३९.५-२२), कोल्हापूर (३४-२३.६), महाबळेश्वर (२७.४-१७.६), मालेगाव (३६.६-२३.२), नाशिक (३३.२-२२.६), निफाड (३५.६-२४.४), सांगली (३५.७-२४), सातारा (३६.२-२२), सोलापूर (३८.९-२६.६), डहाणू (३३.८-२५.९), रत्नागिरी (३३.७-२६.३), छत्रपती संभाजीनगर (३६.६-२५.२), धाराशिव (३८.९-२३), परभणी (४०.४-२५.६), अमरावती (४०.८-२३.३), भंडारा (३७-२६), बुलडाणा (३६.२-२३.८), ब्रह्मपुरी (४०.१-२५.१), चंद्रपूर (४०.४-२६.८), गडचिरोली (३९-२५.२), गोंदिया (३९.४-२५.८), नागपूर (३९.१-२६), वर्धा (४०-२५.६), यवतमाळ (३९-२४).