नागपूर विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, रविवारी नागपूरसह अनेक शहरांमध्ये तापमानाने ४४ अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत असून, हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवला आहे.भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवसांसाठी देशभरात टोकाच्या हवामान परिस्थितीचा इशारा दिला आहे. एका बाजूला राजस्थान, गुजरातसह पश्चिम भारतात उष्णतेची लाट तीव्र होत असून, दुसऱ्या बाजूला केरळ, तामिळनाडू आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी विविध राज्यांमध्ये यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
रविवारीची स्थिती :
7 एप्रिल रोजी नागपूरचे कमाल तापमान 44.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 3.8 अंशांनी अधिक होते. अकोल्यात सर्वाधिक ४४.३ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये 43.8, ब्रह्मपुरीत 43.7, वर्धा 43.5, अंबरवाडा 43.2 अंश इतके तापमान मोजले गेले. यवतमाळ व गोंदियामध्येही पारा ४३ अंशांच्या घरात पोहोचल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.
पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ भागात उष्णतेची लाट 7 ते 9 एप्रिलदरम्यान अधिक तीव्र होणार आहे. या भागांत काही ठिकाणी 45 अंश सेल्सिअसहून जास्त तापमान नोंदवले गेले असून, बारमेर आणि कांडला ही देशातील सर्वाधिक तापमानाची ठिकाणं ठरत आहेत. यामुळे 7 व 8 एप्रिलसाठी रेड अलर्ट, तर 9 एप्रिलसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हिटवेव्हचा इशारा :
भारतीय हवामान विभागाने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, आवश्यक असल्यास अंगावर पाणी शिंपडून बाहेर पडावे, डोके व चेहरा झाकून ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि मध्यप्रदेशातही तापमान झपाट्याने वाढत असून, १० एप्रिलपर्यंत या भागांत उष्णतेची लाट कायम राहील. यासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट दिले गेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उष्ण हवामानामुळे या भागांतील नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला अमरावती, नागपूरमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट आहे. 11 आणि 12 एप्रिल रोजी पुन्हा एकदा अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यात गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.