अर्भकाचा दफनभूमीतील मृतदेह संशयास्पदरीत्या गायब; “या गंभीर प्रकाराला प्रशासन जबाबदार सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह

0

वैकुंठ स्मशानभूमीसह अन्य स्मशानभूमीमधील अस्वच्छता, गैरसोई उघड होत असतानाच आता रामटेकडी येथील दफनभूमीत दफन केलेला अर्भकाचा मृतदेह संशयास्पदरीत्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा स्मशानभूमी, दफनभूमीतील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या घटनेबाबत महापालिकेने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वैकुंठ स्मशानभूमीमध्ये काही महिन्यांपूर्वी मृतदेहाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तुकडा असल्याचा प्रकार उघडकीस आला होता, त्याचा शोध घेतल्यानंतर तो पावाचा तुकडा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे स्मशानभूमीची सुरक्षा, तेथील असुविधा व अस्वच्छतेचा प्रश्‍न पुढे आला होता.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

या घटनेनंतर आता दफनभूमीमधील दफन केलेला मृतदेहच गायब झाल्याचा गंभीर प्रकार रामटेकडी येथे उघडकीस आला आहे. रामटेकडीतील औद्योगिक वसाहतीजवळ दफनभूमी आहे. या दफनभूमीमध्ये मागील आठवड्यात एक दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह दफन करण्यात आला होता.

दरम्यान, बुधवारी (ता.६) दफनविधी केलेल्या ठिकाणची माती उकरण्यात आल्याचे निदर्शनास आले, अधिक पाहणी केल्यानंतर तेथे दफन केलेल्या अर्भकाचा संशयास्पदरीत्या मृतदेह गायब झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर महापालिकेच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

त्यानंतर या घटनेची तातडीने वानवडी पोलिस ठाण्यात महापालिकेच्यावतीने तक्रार देण्यात आली आहे, दफनभूमीच्या ठिकाणी महापालिकेचे सुरक्षा रक्षक असतात. तसेच तेथे सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेले आहेत. तरीदेखील हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली. “या गंभीर प्रकाराला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. तेथील सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित कुटुंबाची व पुणेकरांची माफी मागावी.’ अशी मागणी जगताप यांनी केली.

‘दफनभुमीत दफन केलेला अर्भकाचा मृतदेह गायब असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तत्काळ वानवडी पोलिस ठाण्यात तत्काळ तक्रार दिली आहे. तेथे सुरक्षा रक्षक असुन सीसीटीव्ही देखील आहेत. या घटनेचा पोलिसांकडुन तपास केला जात आहे.’

           – राकेश वीटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार