पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. यानंतर आता स्वारगेट एसटी डेपोमधल्या 23 सुरक्षारक्षकांचे तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक तात्काळ कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. याशिवाय स्वारगेट एसटी डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.






स्वारगेट डेपोमध्ये काय झालं?
पुण्यात शिवशाहीमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. पहाटे साडे पाच वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर ही धक्कादायक घटना घडली आहे. दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. 26 वर्षीय तरुणी पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. तिनं दत्तात्रय गाडेला फलटणला जाणारी बस कोणती? हे विचारल्यानंतर त्यानं तिला चुकीची माहिती देत चुकीच्या बसमध्ये बसण्यास सांगितलं. आणि त्या दरम्यान बस स्थानकात तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
दरम्यान आरोपीच्या भावाला शिरूरमधून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पोलिसांची पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती आहे. स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर नीलम गोऱ्हेंनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडूनही सविस्तर माहिती घेतलीय. मात्र या घटनेनंतर राजकारणही तापल्याचं पाहायला मिळतंय.
पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारातील सुरक्षा रक्षकांच्या केबीनची शिवसेना उबाठाचे नेते वसंत मोरे यांनी तोडफोड केली आहे. स्वारगेट बस स्थानकातल्या बसमध्ये कंडोमची पाकीटं, दारुच्या बाटल्या, मुलींची कपडे सापडले आहेत. अशातच 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरेंसह शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर शिवसेना उबाठाची महिला आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.











