प्रत्येक विवाहित महिलेला वाटतेय आपलीच कथा.. गुगलवर सर्वाधिक सर्च होतोय ‘हा’ चित्रपट

0

अरेंज्ड मॅरेज, लग्नापूर्वी सर्वकाही छान पण लग्नानंतरचा सासुरवास पाहून प्रत्येक विवाहित महिलेला जणू ही आपलीच कथा पडद्यावर मांडली की काय, असा प्रश्न पडू लागतोय. अत्यंत कमी बजेटच्या या चित्रपटाने सोशल मीडियावर बरीच चर्चा घडवून आणली आहे. सध्या गुगलवर हा चित्रपट सर्वाधिक सर्च केला जातोय. त्याचप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याला सर्वाधिक ओपनिंग मिळाली आहे. हा चित्रपट आहे ‘मिसेस’. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा यात मुख्य भूमिकेत आहे. ‘मिसेस’ या चित्रपटाला 150 मिलियन स्ट्रीमिंग मिनिटांसह ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा ओपनिंग वीकेंड मिळाला आहे. या चित्रपटाने प्रीमिअरपासूनच देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट गुगलवर 4.6/5 च्या युजर्सच्या रेटिंगसह आणि 7.3 आयएमडीबी रेटिंगसह सर्वाधिक सर्च केला गेलेला चित्रपट ठरला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आरती कडव या मराठमोळ्या दिग्दर्शिकेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाच्या कथेचं आणि कथा सादरीकरणाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. सान्याने यात दमदार भूमिका साकारली आहे. सान्या नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिका साकारताना दिसते. त्यामुळे तिची चित्रपट निवड किती परफेक्ट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यामध्ये सान्यासोबच निशांत दहिया, कंवलजित सिंह यांच्याही भूमिका आहेत. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

प्रशिक्षित डान्सर आणि डान्स शिक्षिकेची ही कथा आहे. अरेंज्ड मॅरेजनंतर ती घरकामात इतकी व्यग्र होते की ती स्वत:चं अस्तित्त्व, स्वत:ची स्वप्नं, स्वत:चं स्वातंत्र्य सर्वकाही गमावून बसते. लग्नानंतर विवाहित महिलेनं कसं राहिलं पाहिजे आणि घरातील कामं कशी केली पाहिजेत, याबद्दल समाजाने ठरवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात ती अक्षरश: खचून जाते. सोशल मीडियावर आणि विशेषत: महिलांमध्ये या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. दैनंदिन आयुष्यातील अनेक प्रसंग त्यात जसंच्या तसं दाखवण्यात आल्याचं अनेकांनी म्हटलंय. त्यामुळेच प्रेक्षकांना हा चित्रपट आपलासा वाटतोय. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये क्लोजिंग चित्रपट म्हणून ‘मिसेस’ची निवड झाली होती. तिथेच सान्याला तिच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार