पुण्यातील पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर म्हटले जाते, परंतु या भागातील चिखली आणि कुदळवाडीमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 465 एकर जमिनीवरील 2845 अनधिकृत बांधकामे आणि टिन शेड हटवण्यात आले आहेत. या भागात अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू होते, जिथे लाखो लोकांना रोजगार मिळाला होता. पण महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे सुमारे एक ते दोन लाख लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. चिखली-कुदळवाडीमध्ये 8 फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू आहे आणि सोमवारपर्यंत ती सुरू ठेवण्याची योजना आहे.






नदी प्रदूषण आणि वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. या कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण, या भागातील बहुतेक भंगार गोदामं होती. ज्यावर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून होती.
स्थानिक व्यावसायिक आणि कामगारांनी या कारवाईला विरोध केला होता. त्यांचं म्हणणं आहे की, ते गेल्या 25 वर्षांपासून या भागात व्यवसाय करत होते आणि महानगरपालिकेला करही भरत होते, मग अचानक एवढी मोठी कारवाई का करण्यात आली? त्यांनी असाही आरोप केला की, स्मार्ट सिटी प्रकल्पात भंगार गोदाम हा अडथळा मानला जात होते.
व्यापारी आणि कामगारांनी केला विरोध
लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, ही एक अमानवी आणि क्रूर कृती आहे, ज्यामुळे हजारो लोक बेघर आणि बेरोजगार झाले आहेत. या नुकसानीची भरपाई महानगरपालिका आणि प्रशासन करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचेही सांगण्यात आले आहे.











