”जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती” फडणवीस बरसले

0

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर जात असून एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. त्यावर फडणवीसांनी अत्यंत कडक शब्दांमध्ये खडसेंचा समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याबद्दल बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं जात नाही. कापूस उत्पादक अडचणीत आहे. शेतकरी मरायला लागला आहे. कापसाला भाव नसल्यामुळे किमान सहा हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी करत सरकार कांदा उत्पादक, केळी उत्पादक आणि कापूस उत्पादकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून त्यानिमित्त देवेंद्र फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यापूर्वी त्यांना खडसेंबद्दल पत्रकारांनी विचारलं. फडणवीस म्हणाले की, एकनाथ खसडेंनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय आहे पण काळे झेंडे दाखवून काय मिळणार आहे. खसडेंचं असं झालंय की त्यांना नवीन मालक मिळाला आहे ते सांगतील तसं खडसेंना वागावं लागतं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, जमिनीत काळं तोंड केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती. ते परिवारात राहिले असते. परंतु या काळ्या झेंड्यांना आम्ही घाबरत नाही. जळगावची जनता आमच्यासोबत आहे.

देशातील विरोधकांच्या एकजुटीबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले, हे सगळे एकत्र आलेत याचं कारण यांचे घोटाळे बाहेर निघत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत आहे म्हणून ते एकत्रित आलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो असं कुणीही म्हणत नाहीये. कारण भाजप सरकारने देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं केलेली आहेत.