बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या घटनेचा प्रमुख आरोपी असा आरोप असलेला वाल्मिक कराड हा काल स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. त्यानंतर त्याला बीड कोर्टाने १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. विरोधकांच्या टीकेला भाजपचा प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.






चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वाल्मिक कराडच्या शरण येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलात. त्यावर त्यांनी जर एखादा आरोपी शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल तर त्यावर टीका टिपणी करण्यात अर्थ नाही, अशा शब्दात विरोधकांना सुनावले.
“आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागतो”
“आतापर्यंत म्हणत होते, त्याला पकडत नाही, पकडत नाही. शरण आला तर आता टीका करत आहेत. या प्रकरणातला कोणीही आरोपी सुटणार नाही. त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, चार्जशीट तयार करावी लागते, गुन्हा दाखल करावा लागतो. त्याचप्रमाणे तपास सुद्धा करावा लागतो. आरोपीला शिक्षा होणे, तपास असा झाला पाहिजे की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागतो. पण काहींना टीकाच करायची असते”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला.
“आम्ही या तपासात कोणालाही सोडणार नाही”
यानंतर बीडमधील मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. “देवेंद्रजींनी योग्य प्रकारे तपासाचे काम सुरू केलेला आहे. गावकऱ्यांनी सरकारवर आमच्यावर विश्वास ठेवावा. आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे. आम्ही या तपासात कोणालाही सोडणार नाही, यासाठी गावकऱ्यांनी साथ द्यावी आणि तपास यंत्रणांना सहकार्य करावे अशी मी विनंती करतो”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
प्रत्येक आमदाराला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
“कुठल्याही प्रकरणांमध्ये काय कारवाई झाली आहे, याचा सरकार योग्य तो तपास करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक आमदारांनी लक्षात घेतलं पाहिजे कुठल्या आमदारांनी मीडियाच्या माध्यमातून तपासामध्ये अडचणी येतील असं काही बोलू नये. मीडियामध्ये बोलण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि सरकारशी बोलला तर चांगला मार्ग निघू शकतो. योग्य तपास होऊ शकतो. योग्य तो न्याय मिळू शकतो”, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.











