बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन भाजपचे नेते सुरेश धस हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानुसार त्यांनी नुकताच एक खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा झाला असून त्याचं थेट मलेशियाचं कनेक्शन असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.






संतोष देशमुख प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघात एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी. या गावात एकाच व्यक्तीच्या नावावर ९ अब्ज रुपयांचा पैशांचा व्यवहार झाला आहे. तुम्ही म्हणता की १०० कोटींच्यावर घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे मग बीड जिल्ह्यात जर केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर ९ अब्ज रुपयांचा (९०० कोटी) व्यवहार झाला असेल तर मग कोणत्या यंत्रणेनं हे तपासलं पाहिजे?”
हा अब्जावधी रुपयांचा घोटाळा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात झाला आहे. या प्रकरणाच्या तपासात चांगलं काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले. तसंच जे निष्क्रीय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करु असं सुरु असून एवढ्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपींचे त्यांनी जामीन करुन दिले तसंच त्यांना सहकार्यही केलं. या घोटाळ्यांची लिंक थेट मलेशियापर्यंत जाते. हा आकाचा नवा परळी पॅटर्न असल्याचा आरोपही यावेळी धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केला.
बीड जिल्ह्यातील कोणतंही प्रकरण घ्या, कुठलीही घटना घ्या यामागे एकच आका असतो. गँग्स ऑफ वासेपूर सारखी परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या आकाच्या नावावर सध्या किती जमिनी आहेत हे एकदा तपासा, असंही सुरेश धस यांनी यावेळी म्हटलं.
काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण?
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांचा अमानुषपणे खून करण्यात आल्याचं उघड झालं होतं. या गावाजवळील पवन ऊर्जा प्लान्टमधील खंडणी प्रकरणावरुन हे हत्याकांड झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ७ पैकी ४ आरोपींनी अटक केली आहे. याप्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.











