मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वायकरांच्या खासदारकीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांची सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवत सुनावणी पूर्ण झाल्याचे निश्चित केले असल्याने या प्रकरणी उद्या फैसला सूनावण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता. यानंतर अमोल किर्तीकर यांनी मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करावे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.






लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा)चे अमोल गजानन कीर्तिकर यांना प्रत्यक्ष मतमोजणीच्या दरम्यान विजयी उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांच्यापेक्षा फक्त एक मत जास्त म्हणजेच 451095 तर शिवसेने तर्फे निवडणूक लढणारे रवींद्र वायकर यांना 451094 मते मिळाली होती. त्यानंतर सुरुवातीला टपाली मते मोजण्याची पद्धत असतानाही या मतदारसंघांमध्ये टपाली मते शेवटी मोजण्यात आली त्यामध्ये अमोल कीर्तिकर यांना फक्त 1501 मते मिळाल्याने त्यांना एकूण मते 452596 (47.4%) मिळाली तर रवींद्र दत्ताराम वायकर यांना टपाली मते 1550 मिळाल्याने एकूण मते 452644 (47.4%) झाल्याने अवघ्या ४८ मतांनी विजय झाला होता. या सर्व प्रकरणांमुळे उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातील वातावरण तप्त झाले आणि थेट न्यायालयामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली असून, याचा निर्णय राखून ठेवलाय. उच्च न्यायालयाच्या वतीने हा निकाल कधी दिला जातोय हे पाहणे गरजेचे आहे.










