मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहे. अमित ठाकरेंनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अमित ठाकरेंसोबत राज ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, आई शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.






अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील उद्यान गणेशमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला जाऊन अभिवादन केलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांना देखील अमित ठाकरेंनी अभिवादन केलं. त्यानंतर अमित ठाकरेंनी पत्नीसह सिद्धविनायक मंदीरात जाऊन दर्शन घेतले. अमित ठाकरे उमेदवारी दाखल करताना मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी केली होती.
अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मी निवडणुकीसाठी तयार आहे. बाकी कोणाबाबत मला माहिती नाही. कोण फॉर्म मागे घेणार याबाबत माहीत नाही. मी माझा व्हीजन घेऊन पुढे जाणार आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच माझ्यावर दडपण नाही. मला माध्यमांशी बोलतानाचा दडपण जाणवतं, हेच एक दडपण आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली. तसेच आदित्य ठाकरेंनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात असं पत्रकारांनी सांगितल्यानंतर, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, असं अमित ठाकरे म्हणाले. मला माहीम मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत पोहाचायचं आहे, अशी माहिती देखील अमित ठाकरेंनी दिली.
माहीम विधानसभेकडे सर्वांचं लक्ष-
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यादरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माहीमविधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माहीममध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
अमित ठाकरेंना पाठिंबा देणे आमचेही कर्तव्य- दीपक केसरकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे. मात्र, तिथे आमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखून सन्मान दिला जाईल. या ठिकाणी तोडगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढणार आहेत. अमित ठाकरेंना पाठिंबा देणं काम आहे, राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम आहे, असं विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का?, तसेच सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.













