मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू पहाटे पहाटेच जरांगे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?

0

आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता अनेक नेते हे सावधगिरीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये विविध पक्षातील आमदार, नेते हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठी सहसा रात्री उशिरा किंवा पहाटे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. . त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली. त्यानंतर आज पहाटेच मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बजरंग सोनवणे यांनी घेतली भेट
तर दुसरीकडे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी विविध पक्षातील राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. काल बीडचे खासदार आणि शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यात 6 विधानसभा आहेत. त्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे. यानंतर बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया देताना ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे, असे म्हटले होते.

मनोज जरांगे पाटील आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझी जरांगेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. बीड जिल्ह्यातील 6 जागा मागणे काही गैर नाही. पण तरी एखादी जागा महाविकास आघाडी किंवा मित्र पक्षाला जाईल. बीडमध्ये आमच्या सहा विधानसभा निवडून येतील, असा मला विश्वास आहे, असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सुरेश वरपूडकरही मनोज जरांगेच्या भेटीला
तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. पाथरी विधानसभा मतदार संघात मराठा समाज निर्णायक असल्याने या ठिकाणी जरांगे पॅटर्न चालतो. याच कारणामुळे वरपूडकर यांनी भेट घेतली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

तसेच बीडमधील केज विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या संगीता ठोंबरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संगीता ठोंबरे यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेऊन तुतारी चिन्हावर लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण बीडमध्ये जरांगे पाटील फॅक्टर चालत असल्याने संगीता ठोंबरे यांनी जरांगेंची भेट घतली. त्यासोबतच परभणी विधानसभेचे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राहुल पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मनोज जरांगेंसोबतच्या भेटीगाठी महत्त्वाच्या
दरम्यान बजरंग सोनावणे, सुरेश वरपूडकर, संगीता ठोंबरे, राहुल पाटील हे सर्व नेते मराठवाडा तसेच बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत. या सर्व नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा केली. सध्या जे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत, त्या नेत्यांच्या मतदारसंघात जरांगे पाटील पॅटर्न चालत आहे. त्यामुळे या भेटीगाठी महत्त्वाच्या असल्याचे बोललं जात आहे.