टाटा उद्योग समुहाचा आधारवड असलेल्या रतन टाटांचं बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कॅण्डी येथे निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी टाटा यांनी अखेरचा श्वास घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपनी मालकांनी आणि सीईओंनी सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.भारतीय उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या आघाडीच्या उद्योजकांमध्ये मागील तीन दशकांहून अधिक काळापासून रतन टाटांचं नाव आवर्जून घेतलं जातं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक आघाडीच्या कंपनी मालकांनी टाटांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये अगदी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल, पीपल ग्रुपचे सीईओ अमन मित्तल, शिओमीचे माजी सीईओ मनू कुमार जैन आणि पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकर शर्मा यांच्यासोबतच भारतपेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अश्नीर ग्रोव्हर यांचाही समावेश आहे. मात्र आपल्या भावना व्यक्त करताना पेटीएमच्या मालकांनी केलेली पोस्ट वाचून अनेकांना संताप अनावर झाल्याने विजय शंकर शर्मांना आपली पोस्ट डिलीट करावी लागली.






स्क्रीनशॉट व्हायरल
सोशल मीडियावरुन अनेकांनी टाटांबद्दल केलेल्या पोस्ट, त्यांच्या आठवणी जागवल्याचे किस्से व्हायरल झाले. मात्र विजय शंकर शर्मा यांची पोस्ट पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हा संताप इतका होता की याची दखल विजय शंकर शर्मा यांना घ्यावी लागली आणि पोस्टच डिलीट करावी लागली. मात्र तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. आता तेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विजय शंकर शर्मा यांच्या मूळ पोस्टचा असाच स्क्रीनशॉट शिवम सौरव झा नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे.
पोस्टमध्ये काय होतं?
“ते प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे आदर्श व्यक्ती होते. भारतामधील सर्वात प्रेमळ उद्योजकाबरोबर पुढील पिढीच्या उद्योजकांना संवाद साधता येणार नाही. ओके टाटा बाय, बाय,” अशी पोस्ट विजय शंकर शर्मा यांनी केली होती. या पोस्टमधील शेवटची ओळ ही अनेकांना अपमानास्पद वाटली.
अनेकींनी व्यक्त केली नाराजी
अनेकांनी एखाद्याच्या मृत्यूसंदर्भात लिहिताना हे असे शब्द वापरणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. “इंटरनेटवरुन लिहून घेतलं असेल,” असं म्हणत एकाने फारच चुकीची शब्द रचना वापरण्यात आल्याचं म्हटलं आङे. “हा माणूस बातम्यांमध्ये झळकण्याची एकही संधी सोडत नाही,” असा टोला अन्य एकाने लगावला आहे. तर दुसऱ्याने, “हे फार चुकीचं आहे,” असं म्हटलंय. भरपूर लोकांनी ही पोस्ट संवेदनशून्य असल्याचं म्हटल्यानंतर विजय शंकर शर्मा यांनी ती डिलीट केली.
अनेकांनी हे असले शब्द विजय शंकर शर्मा यांच्याकडून अपेक्षित नसल्याचं म्हटलं आहे. विजय शंकर शर्मा हे पेटीएमचे संस्थापक असून त्यांची एकूण संपत्ती 1.2 बिलियन अमिरेकी डॉलर्स म्हणजेच 10 हजार 75 कोटी (10075,55,40,000) रुपये इतकी आहे. उद्योग रत्न रतन टाटा यांना समर्पित आयुष्यासाठी संपूर्ण देश हळूहळू व्यक्त करत असताना विजय शंकर शर्मा यांनी व्यक्त केलेल्या श्रद्धांजली मुळे सध्या देशांमध्ये boycott पेटीएम ही नवी चळवळ सुरू होण्याची शक्यता आहे.
शाह यांची उपस्थिती
दरम्यान, मुंबईत रतन टाटांवर गुरुवारी अंत्यसंस्कार झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारच्यावतीने टाटांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन टाटांना श्रद्धांजली वाहिली. मोदी सध्या पूर्व आशियाई समिटसाठी लाओसच्या दौऱ्यावर असल्याने ते अंत्यंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.











