पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द; विमानसेवाही प्रभावित पुणे मेट्रोचे लोकार्पण लांबणीवर नेमकं काय आहे कारण?

0
30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित असलेला पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. प्रशासनाकडून पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा दौरा रद्द झाल्याने पुणे मेट्रोचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

पंतप्रधान मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार होते. शहरातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा देखील होणार होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या ठिकाणी मुरूम-खडी टाकून चिखल कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. पण ते यशस्वी न झाल्याने सभेचे स्थळ बदलले जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आज देखील पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे पीएम मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पुणे दौऱ्यावळी पंतप्रधान मोदी दोन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करणार होते. यामध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा कॉरिडॉर यांचा समावेश होता. तसेच दिवाणी न्यायालय ते स्वारगेटपर्यंत धावणाऱ्या भूमिगत मेट्रो मार्गाचे लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते होणार होते. मात्र आजचा त्यांचा दौरा रद्द झाल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडले आहे.

मुंबई पुण्यात आजही मुसळधार पाऊस

बुधवारपासूनच पुणे आणि परिसरात तुफान पाऊस होत आहे. येते १३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागाने गुरूवारी देखील येथे पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमांवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गुरूवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला होता.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

आज मुंबई आणि परिसरात देखील हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे बीएमसीने आवश्यक काम नसेल तर घरातून बाहेर पडू नये असे अवाहन नागरिकांना केले आहे. तसेच मुंबईत देखील पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारी मुंबई शहरात पावसाने हाहाकार उडवला होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती, तसेच विमानसेवा देखील प्रभावित झाली होती. दरम्यान हवामान विभागाने गुरूवारी सकाळी मुंबई आणि परिसरातील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे