जागा वाटपापूर्वीच शरद पवार गटाचा मोठा डाव? संपूर्ण जिल्हाच पिंजून 12 जागांसाठी 2 दिवसांत 6 जाहीरसभा

0
3

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आता शरद पवार गटाकडून २६ व २७ सप्टेंबर रोजी नगर शहरासह विविध तालुक्यात दोन दिवसांत ते सहा ठिकाणी जाहीरसभा घेणार आहेत. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभा महत्वाच्या ठरणार आहेचत. जागा वाटपात पक्षाकडून दावा केला जात असलेल्या विधानसभा मतदारसंघात पवार गटाच्या सभा होत आहेत. मात्र, कर्जत-जामखेडमध्ये या दौऱ्यात त्यांची सभा नाही.

गुरूवारी २६ सप्टेंबरला अकोले तालुक्यातून जयंत पाटील यांच्या दौऱ्याची सुरवात होणार आहे. सकाळी अकोले तालुक्यात कोतूळ, दुपारी शेवगाव आणि सायंकाळी श्रीगोंद्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्या दिवशी रात्री नगर शहरात त्यांचा मुक्काम आहे. शुक्रवारी सकाळी नगर शहर, दुपारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन, त्यानंतर राहुरी आणि सायंकाळी पारनेरमध्ये त्यांची सभा होणार आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्जत-जामखेड, पारनेर, नगर शहर, अकोले, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा या जागांवर दावा केला जात आहे. त्यादृष्टीने जयंत पाटील यांनी यातील सहा ठिकाणच्या सभांचे नियोजन केले असले तरी कर्जत-जामखेडमध्ये मात्र त्यांची सभा होणार नाही. शिवाय नगर शहरातील जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याचीही चर्चा आहे. तरीही पाटील यांची नगर शहरात जाहीर सभा होत आहे.

पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

नगर जिल्ह्यावर पवार यांचे सुरवातीपासूनच विशेष लक्ष आहे. यावेळी अहमदनगर लोकसभेची जागा त्यांच्या पक्षाने जिंकल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. पवार विरूदध विखे पाटील असा जुनाच राजकीय संघर्ष जिल्ह्यात पहायला मिळतो. त्यामुळे पवार नगरमध्ये जास्त घालतात. जागा वाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच एकाच जिल्ह्यात सलग सहा सभा घेऊन पवार गटाने आपले नगरकडे लक्ष असल्याचे पुन्हा एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

पवारांच्या सध्या राज्यभर सुरू असलेल्या दौऱ्यात अनेक ठिकाणी भाजपसह विविध पक्षांतील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात या सहा सभेच्या दरम्यान असा कोणाचा प्रवेश होता का? याकडेही लक्ष लागले आहे. कर्जत-जामखेडमधील आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक मधुकर राळेभात यांनी पवारांची साथ सोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कर्जतमधून महविकास आघाडीतील काही घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. या घडामोडींवर आता ६ सभेत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली