वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तूल जप्त करण्यात आलेय.






मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसऱ्यांदा देखील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे त्यांचे रवानगी येरवडा कारागृह होऊ शकते.
सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद
मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला असून त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. तर दिलीप खेडकर यांनी 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र इतर आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
मनोरमा खेडकरचे धमकावण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मनोरमा खेडकरांचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले. मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.











