मोठी बातमी! काँग्रेसमुळे महाविकास आघाडीची नियोजित बैठक पुढे ढकलली

0

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात काय-काय घमासान होतं ते आता आपल्याला बघायला मिळेलच. पण सध्या विरोधकांच्या गोटात जोरदार खलबतं सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आतापासून विधानसभेला कुणाला किती जागा मिळाव्यात याबाबत प्रसारमाध्यमांसमोर वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. महाविकास आघाडीत आता विधानसभेला कुणाचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी ठेवून निवडणूक लढवली जाणार? याबाबत माध्यमांसमोर मविआ नेते भूमिका मांडताना दिसत आहेत. या सर्व पडद्यामागच्या घडामोडींबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला सुरु असलेल्या घडामोडींची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांना अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

“आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून विधानसभेचा चेहरा कोण असेल, याबाबत निर्णय घेऊ. आम्ही २५ तारखेला एकत्र बसणार होतो. पण दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक असल्याने आमची बैठक पुढे ढकलली गेली. लवकरच त्याबाबत चर्चा होईल. आमची अपेक्षा आहे की, कुठल्याही घटक पक्षाने या विषयी प्रसारमाध्यमांमधून वक्तव्य करु नये”, असं आवाहन करत जयंत पाटील यांनी मविआतील आतली बातमी सांगून टाकली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आगामी घडामोडी या महत्त्वाच्या असणार आहेत.

जयंत पाटील यांचा प्रकाश आंबेडकरांना टोला?
“आमची विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चाच झालेली नाही. त्यामुळे याबाबत निर्णय होण्याचा प्रश्नच नाही. आम्हाला महाराष्ट्रात जे बरोबर येतील त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची मानसिकता आहे. पण बरोबर येतो म्हणून ऐनवेळी बाजूला जाणं हे यावेळी होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे”, असं म्हणत जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना नाव न घेता टोला लगावला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

विधीमंडळाच्या अधिवेशन निमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज विधीमंडळात गेले. यावेळी एक अनोखा प्रकार बघायला मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी एकाच वेळी लिफ्टने प्रवास केला. या घटेनबाबत जोरदार चर्चा होत आहे. या घटनेवर जयंत पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “विधानसभेत अनेक जण एकमेकांना भेटत असतात. एकमेकांशी वैयक्तिगत स्वरुपात चांगलं वागणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे त्यातून काही अर्थ काढणं हे चुकीचं आहे”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

महाराष्ट्र आज सहाव्या क्रमांकावर, जयंत पाटील यांचा दावा
यावेळी जयंत पाटील यांनी मोठा दावा केला. “महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं. पहिल्या-दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आज सहाव्या क्रमांकावर गेलं. महाराष्ट्र सरकार चालवणाऱ्यांना याबाबतच्या आकडेवारीने, महाराष्ट्राची अधोगती किती झाली हे त्यांना कळलं असेल. महाराष्ट्राची अधोगती ही मोठी घातक बाब आहे. महाराष्ट्राचा विकास वाढीचा वेग हा देशाच्या विकास वाढीच्या सरस पाहिजे होता. पण तसं दिसत नाही. आता सरासरी देशाचा जो वेग आहे, त्याच कॅटेगरीत आम्ही जावून बसलेलो आहोत. त्यामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली. या वर्षभरात या सरकारने महाराष्ट्र मागे नेला आहे हे आकडेवारीने सिद्ध झाला आहे. जीडीपीसुद्धा सुद्धा समान झाला आहे. महाराष्ट्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारं राज्य आहे. ज्यावेळेस राज्यांचा जीडीपीचा दर जास्त असतो त्यावेळी देशाचादेखील जीडीपी वाढतो. महाराष्ट्राची देशाचा जीडीपी वाढवण्यातली मदतदेखील कमी झाली आहे. कारण महाराष्ट्राचं दरदोडी उत्पन्नदेखील कमी झालं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता