पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांचाही टाहो! ताईंचाही बांध फुटला; फक्तं मला 100 दिवस द्या अन्यथा संन्यास घेईल

0

लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर चिंचेवाडी येथील आत्महत्या केलेल्या पोपट वायभासे युवकाच्या घरी पंकजाताई यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. मात्र पंकजा मुंडेंना पाहून कुटुंबातील सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पंकजा मुंडे घरी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला, त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. विधानसभेनंतर आता लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना  पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, विधानसभेपेक्षा लोकसभा निवडणुकीतील त्यांचा पराभव मुंडे समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच, गेल्या 10 दिवसांपासून बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून काही ठिकाणी बंद पुकारले होते. 2 युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यापैकी, बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील युवक पोपट वायभासे यानेही आपले जीवन संपवले होते. पंकजा मुंडेंनी दिल्ली दौऱ्यानंतर आज बीडमध्ये येताच, वायभासे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीवेळी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंनाही अश्रू अनावर झाले होते.

पंकजा मुंडेंनी पोपट यांच्या पत्नी व मुलांचे सांत्वन केले, त्यावेळी पंकजा मुंडेंना धाय मोकलून रडताना पाहून सर्वच भावूक झाले होते. कुटुंबीयांनी टाहो फोडताच, उपस्थितांचेही डोळे पाणावले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलतानाही पंकजांचा कंठ दाटला होता. त्यावेळी, पंकजा यांनी सर्वच कार्यकर्ते आणि समर्थकांना उद्देशून आवाहन केलं आहे. ”मी मुंडेसाहेबांनतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना कुटुंबापेक्षाही जास्त जीव लावला. लोकांनीही मला एवढा जीव लावला की, माझ्या पराभवानंतर ते जीव देत आहेत, पण हे मला मान्य नाही. मी स्वतःचं संतुलन कधीही स्वतःचे संतुलन बिघडू दिल नाही. मी कधीही भूमिका कमकुवत घेतली नाही. पण, या आत्महत्येच्या घटनांमुळे मी कमकुवत झाली आहे. मला खूप अपराधी वाटत आहे. कारण, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला मी काहीच देऊ शकत नाही,” अशा शब्दात पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अशी परिस्थिती निर्माण करु नका

”जय-पराजय अनेक झाले, मुंडेसाहेबांचा पराभव झाला, विलासराव देशमुख साहेबांचाही झाला. पण, पराभव एवढे जिव्हारी लागण्याचं कारण ही आत्ताची परिस्थिती आहे. माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका, आणि त्यांचा जीव ज्या नेत्यांमध्ये आहे त्यांनाही करू नका, त्यांना स्वतःचे जीव द्यावे लागतील अशी परिस्थिती निर्माण करू नका, अशी माझी विनंती आहे.”, असे पंकजा यांनी म्हटले.

नाहीतर मी राजकारण सोडेन

”मला वाटतं की इतकं प्रेम कोणत्याच नेत्यावर कोणी करू नये की, त्यांनी त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यावा. जर तुम्हाला हिंमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. नाहीतर मी राजकारण सोडून देईन, अजून जर कोणी जीव दिला तर. कारण, राजकारणामुळे हे होतंय असं मला वाटतं, असे म्हणत पंकजा मुंडेंनी समर्थकांना आवाहन केलं आहे. मी सगळ्यांच्या पाया पडून सांगते काही करा पण स्वतःचा जीव देऊ नका,” असेही त्यांनी म्हटले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

100 दिवस माझ्यासाठी द्या

पराभवाने विजयाने मी हरणारी नाही, पण अशा गोष्टी मला हादरवून टाकतात. हे प्रसंग पाहून मी स्वतः खूप अस्वस्थ आहे. आत्महत्या करायला खूप हिंमत लागते, तुम्ही ती हिंमत पुढचे शंभर दिवस माझ्यासाठी द्या, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू, असेही पंकजा मुंडेंनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.

धनंजय मुंडेंनीही घेतली भेट

बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये, पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले. तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले. काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले. त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबीयांच भेट घेऊन पंकजा मुंडेंनी अश्रू पुसले. दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या पोपटराव वायभासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दोन्ही मुलांच्या नावे अडीच लाखांची मुदत ठेव

मृत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले. दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पोपटराव यांच्या मुलांना देण्यात येत आहे. यावेळी शिवा शेकडे, सुधीर भाऊ पोटे, प्रदीप वायभासे, सचिन वायेभासे, सचिन घुले, प्रा कैलास वायभासे, विलास वायभासे, युवराज वायभासे देवळली चे सरपंच पोपट शेकडे, गंगादेवी चे सरपंच विठ्ठल नगरगोजे, दत्तू शेकडे आदी उपस्थित होते.