देशात 1 एप्रिलपासून अनेक आर्थिक बदल झाले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांना औषधांबाबत मोठा धक्का बसला आहे, कारण आजपासून 384 हून अधिक औषधे महाग झाली आहेत. औषधांचे दर सुमारे 12 टक्क्यांनी वाढले आहेत. अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.






कॅन्सर, हृदयविकार, ॲनिमिया, मलेरिया, अँटी सेप्टिक यासह अनेक औषधे आजपासून नवीन दरात उपलब्ध होणार आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांका (WPI) नुसार औषधांचे दर वाढवण्याची परवानगी सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना दिली आहे. नियमानुसार औषध कंपन्या वर्षभरात केवळ 10 टक्के दर वाढवू शकतात, मात्र यावेळी 2 टक्के म्हणजेच 12 टक्के अधिक दर वाढवण्यात आले आहेत.
औषधांच्या किंमती का वाढल्या?
गेल्या काही वर्षांत फार्मा सेक्टरशी संबंधित उत्पादने 15 ते 100 टक्क्यांनी महाग झाली आहेत. या उत्पादनांमध्ये पॅरासिटामॉल, ग्लिसरीन, प्रोपीलीन ग्लायकॉल, सिरप, सॉल्व्हेंट्स इत्यादींचा समावेश आहे.
यामुळे भारतीय औषध उत्पादकांनी औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या किंमती सुमारे 10 टक्क्यांनी वाढवण्याची परवानगी सरकारकडे मागितली. उत्पादकांना औषधांच्या किंमती 20 टक्के वाढवायच्या होत्या, पण सरकारने त्याला 12 टक्क्यांनी किंमती वाढवण्याची परवानगी दिली. 2023 मध्ये औषध कंपन्यांनी दर 11 टक्क्यांनी वाढवले होते.
आजपासून ही औषधे महाग झाली
महाग झालेल्या औषधांमध्ये व्हिटॅमिन गोळ्या, स्टिरॉइड्स, पेन किलर, टीबी, कॅन्सर, मलेरिया, एचआयव्ही एड्स, अँटी-बायोटिक्स, अँटी-डोट्स, ॲनिमिया, डिमेंशिया औषधे, बुरशीविरोधी औषधे, हृदयविकाराची औषधे, त्वचा रोग संबंधित औषधे, प्लाझ्मा, जंतुनाशक औषधे यांचा समावेश आहे.
पॅरासिटामॉलच्या किंमतीत 130 टक्के वाढ
पॅरासिटामॉलच्या किंमती 130% वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलचा उपयोग तापासह अनेक आजारांच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. त्याच्या किंमतीत झालेली वाढ ही सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी आहे.











