दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केजरीवाल हे तुरुंगातून सरकार चालवू शकत नाहीत. दिल्लीचे राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अरविंद केजरीवाल यांना कथित दारु घोटाळ्यात अटक झाली आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला असून तुरुंगातून सरकार चालवणार, असे म्हटले आहे. त्यामुळे आता दिल्ली राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात संघर्ष वाढू शकतो.






मी दिल्लीच्या जनतेला खात्री देतो की सरकार तुरुंगातून चालणार नाही, असे व्हीके सक्सेना म्हणाले. त्यामुळे दिल्ली सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षाची नवी फेरी होऊ शकते.गरज भासल्यास तुरुंगातून सरकार चालवण्यासाठी न्यायालयाचा सहारा घेतला जाऊ शकतो, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. ते आता ईडी कोठडीत आहेत. केजरीवाल यांनी तुरुंगातून आरोग्य आणि पाणी विभागासंदर्भात दोन निर्णय देखील घेतल्याची चर्चा आहे. भाजपने याविरोधात राज्यापालांकडे तक्रार केली आहे.
केजरीवाल यांच्या अटकेच्या भीतीने आम आदमी पक्षाने दिल्लीत ‘सार्वमत’ही आयोजित केले होते. दिल्लीतील जनतेला विचारण्यात आले की, केजरीवाल यांना अटक झाल्यास त्यांनी पदाचा राजीनामा द्यायचा की तुरुंगातून सरकार चालवायचे? बहुतांश लोकांनी तुरुंगातून सरकारच्या बाजूने मतदान केल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
तुरुंगातून सरकार चालवणे शक्य आहे का?
तुरुंगातून सरकार चालवण्यासाठी राज्यपालांची मान्यता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. तुरुंगातून सरकार चालवण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणींबाबत घटना तज्ज्ञांनी सांगितले, राज्यपालांची इच्छा असल्यास कोणत्याही इमारतीला जेल घोषित करून केजरीवालांना तिथे ठेवता येईल. केजरीवालही येथून सरकारी काम पाहू शकतात. मात्र, राज्यपालांनी हे करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.











