कोथरूड थोरात उद्यान्यामधील मोनोरेल प्रकल्प नागरिकांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही: मनपा आयुक्त

0

पुणे शहरातील कोथरूड परिसरात असणाऱ्या थोरात उद्यान या ठिकाणी मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारत असून यामुळे सदर ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार असुन तसेच या उद्यान्यामधे यांत्रिकीकरण केले जाणार आहे. यामुळे उद्यान्यामधे मोकळा श्वास घेण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही, तसेच विकसित केलेले पदपथ, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार आहेत. याचमुळे सदर प्रकल्पास नागरिकांतून विरोध होत असून कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि आदरणीय खा. वंदनाताई चव्हाण यांच्यावतीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेण्यात आली. यावेळी भेटीदरम्यान थोरात उद्यानाच्या सोबत मुठा नदी काठ सुशोभीकरण कामाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणारे थोरात उद्यान हे अत्यंत जुने आणि प्रशस्त अशा ठराविक उद्यानांपैकी एक ऑक्सिजन हब आहे. थोरात उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि मोकळा श्वास घेण्यासाठी आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी पुणे मनपाच्या मोटर वाहन विभागातर्फे मोनोरेल साकारण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध काम सुरू करण्यात आले आहे.

वाढते शहरीकरण आणि पुणे शहराचा गुदमरणारा श्वास तसेच प्रदूषण वाढत असताना निव्वळ मनोरंजनासाठी नागरिकांचा विरोध पत्करून नागरिकांसाठी केले जाणारे हे विकासकाम रोखण्यात यावे, अशी मागणी आज खा. वंदनाताई चव्हाण यांनी मनपाचे नवनियुक्त आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन नागरिकांचे म्हणणे पटवून दिले. मोनोरेल या गोंडस नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याचे पापकर्म आपण करत असून नागरिकांची कोणतीही मागणी नसल्याने उलटपक्षी विरोध असल्याने सदर प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी विनंती कृती समितीच्या वतीने नागरिकांनी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम राबविण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

याचसह मुठा नदीच्या काठी नदी काठ सुशोभीकरण होत असून सदर ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे काळाची गरज आहे. अन्यथा सांडपाणी आहे त्या स्वरूपात नदीमध्ये मिसळल्यास नदी काठाचे सुशोभीकरण आणि नदीचे प्रदूषण असे चित्र पाहायला मिळणार आहे. तसेच सुशोभीकरण केल्यानंतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे निव्वळ अशक्य आहे. असे न केल्यास सुशोभीकरण कामासाठी खर्च करण्यात आलेला निधी आणि मनपाचा वेळ व्यर्थ खर्ची पडणार आहे. याचमुळे या बैठकीत खा. वंदनाताई चव्हाण यांनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सदर ठिकाणी सर्वप्रथम सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि तद्नंतर काठ सुशोभीकरण करण्यात यावे, अशी भूमिका मांडली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

त्याचप्रमाणे खडकवासला धरण क्षेत्राच्या लगत वाढत असलेल्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात तेथील मैला पाणी खडकवासला धरणामध्ये मिसळत आहे. याबाबत सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे ही बाब सुद्धा मा. आयुक्त साहेब यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यादोन्ही मुद्द्यांवर आदरणीय आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम न राबविण्याचा तसेच पर्यावरणीय विचार करण्याचा शब्द दिला आहे.