भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी येत होत्या. पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्टीकरण पंकजा यांनी वेळोवेळी दिले आहे. विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना डावलण्यात आलेल्या पंकजाताईंना आता बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. लोकसभेची उमेदवारी आपल्याला राज्यातील पक्षश्रेष्ठींनी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.






देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याला पंकजा मुंडे या अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना हवा देण्यात येत होती.
“मी मतांचे राजकारण करण्यासाठी नाही, मी विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आले आहे. ही जबाबदारी मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली आहे. माझं तिकीट राज्याने ठरवलं नाही देशानं ठरवलं आहे. देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काहीतरी माझ्याविषयी चांगलं असेल असा मला विश्वास आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते, “असे त्या म्हणाल्या. त्यांचा रोख पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपकडे होता का, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. त्या बीडच्या धामणगाव येथे बोलत होत्या.
ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचे रक्षण हा माझ्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा विषय आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आल्या होत्या. धामणगाव गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी स्वागताला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
आरक्षण प्रश्नामध्ये कोणीही तरी तिसऱ्याने पोळी भाजून घेऊ नये , दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होणार नाही, यासाठी माझे प्रयत्न राहिलेले आहेत. मराठा समाजाच्या मागणीचा मी योग्य सन्मान करते, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. प्रचाराची तयारी आमची खूप महिन्यांअगोदर सुरू झालेली आहे. पालकमंत्री असताना केलेला विकास जिल्ह्याने पाहिला आहे. ‘सबका साथ सबका विकास’ जिल्ह्याने पाहिला आहे.
‘भाजपच्या कुशीतील वाढलेली मी खरीखुरी कार्यकर्ता आहे. भाजप आणि मुंडेसाहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही,” असे यापूर्वी पंकजाताई म्हणाल्या होत्या. भाजप पक्ष म्हणजे एक व्यक्ती नाही तर ती एक संस्था आहे, असं म्हणत त्यांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनादेखील अप्रत्यक्ष टोला लगावला होता.











