भाजपनं कोल्हापुरात ‘धोबीपछाड’ डाव टाकला; शिंदे चितपट होणार? जागा तुमच्या, पण उमेदवार माञ…

0

भाजपनं एकनाथ शिंदेंकडे एकूण पाच मतदारसंघांत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. कोल्हापुरातील दोन जागांवर भाजपनं अप्रत्यक्षपणे दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदेंची कोंडी झाली आहे.

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. भारतीय जनता पक्ष ३२ ते ३७ जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थतता आहे. माझ्या सोबत असलेल्या १३ खासदारांची तिकिटं कापू नका, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गेल्याच आठवड्यात केली. पण त्यांना शहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच आता भाजपनं शिंदेंना लोकसभेच्या ४ जागांवर उमेदवार बदलण्याची मागणी केली. यातील २ जागा कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

संजय मंडलिक कोल्हापूरचे, तर धैर्यशील माने हातकणंगलेचे खासदार आहेत. दोघेही सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहे. भाजपनं अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला देत दोन्ही मतदारसंघात उमेदवार बदलण्याची मागणी शिंदेंकडे केली आहे. यासाठी शिंदेंवर बराच दबाव असल्याचं कळतं. मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या मागणीबद्दल फारसे सकारात्मक नाहीत. विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. पण भाजपनं कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार बदलण्याची मागणी थेट शिवसेनेत हस्तक्षेप सुरू केल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे भाजपनं दोन्ही मतदारसंघात भाजपनं शिंदेंना उमेदवारीसाठी सुचवलेले पर्याय त्यांच्या पक्षातील नाहीत. कोल्हापूर लोकसभेसाठी समरजीतसिंह घाटगे, धनंजय महाडिक यांची नावं सुचवण्यात आली आहेत. घाटगे कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. ते भाजपचे नेते आहेत. तर महाडिक भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे भाजप शिंदेंच्या मतदारसंघात त्यांच्याच पक्षाकडून स्वत:च्या उमेदवारांची फिल्डींग लावत असल्याचं चित्र आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत सेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींचा पराभव केला. पण इथेही भाजपनं अंतर्गत सर्व्हेचा दाखला देत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. इथे भाजपनं जनुसराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. एकीकडे शिंदे विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्याच्या भूमिकेत असताना भाजपनं त्यांच्यावर उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर, हातकणंगलेसह ठाणे, नाशिक, बुलढाण्यातही उमेदवार बदलण्याची मागणी भाजपनं केली आहे. नाशिक, बुलढाण्यात सेनेचे खासदार आहेत. त्यांचा पत्ता कापण्यात यावा असा भाजपचा आग्रह आहे. भाजपच्या या मागण्यांवर शिंदे काय भूमिका घेणार आणि भाजपकडून येणारा दबाव कसा हातळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?