मुंबई दि. ९ (अधिराज्य) “येवला मुक्कामी मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही या बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेमागे खऱ्या अर्थाने कोणी असेल तर त्या म्हणजे माता रमाई होत, एक जागतिक कीर्तीचा उच्चविद्याविभूषित व्यक्ती व एक पूर्णपणे अशिक्षित महिला असे परस्परविरोधी दोन व्यक्तीमध्ये असणारे प्रचंड प्रेम पाहता माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगावेगळे रसायन होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, तळागाळातील दलित, मागास, बहिष्कृत, अस्पृश्य समाजाला समाजात समान हक्क, न्याय, इज्जत, अधिकार मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नऊ कोटी लेकरांची कुळे उद्धारण्यासाठी पोटच्या चार मुलांना मातीआड करणाऱ्या माता रमाईचा त्याग हा शब्दांत व्यक्त करता येणे शक्य नाही, बाबासाहेबांनी बघितलेल्या प्रत्येक स्वप्नांना मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी फाटक्या लुगड्याला ठिगळ जोडत, उन्हातान्हात सरपण-फाट्या विकून मनिऑर्डर पाठवणारी त्यागमूर्ती रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, वरकरणी देवभोळी, धार्मिक वाटणारी उपाशीपोटी राहून आठवड्यात सहा-सहा दिवस उपवास करणारी रमाईच बाबासाहेबांना मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही प्रेरणा देऊन गेली म्हणूनच मनुवादी हिंदू धर्माच्या बेडीत अडकलेला समाज आज विज्ञानवादी बौद्ध धर्मात मानासन्माने जगतोय त्यावेळी उपवास म्हणून माता रमाईने अन्नाच्या एक एक कणाचा केलेला त्याग आज तिच्या लेकरांच्या मुखात सुखाचा घास म्हणून पडतोय हे विसरून चालणार नाही” असे प्रतिपादन सरसेनानी आनंदराव आंबेडकर यांनी बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ आयोजित माता रमाईच्या १२६ व्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात केले.






बौद्धजन पंचायत समिती आणि संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानसूर्याची सावली, नऊ कोटींची माऊली, महामाता रमाई आंबेडकर यांच्या १२६ वा जयंती महोत्सव बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, इंदू मिलचे प्रणेते, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जेरबेरा वाडिया मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार यांनी अत्यंत लाघवी व प्रभावी शैलीने केले, त्याचबरोबर प्रमुख वक्ता सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्षा, केंद्रीय महिला विभाग प्रमुख, भारतीय बौद्ध महासभा) यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना रमाईच्या जीवनातील अनेक प्रसंग सर्वांसमोर मांडताना रमाई लहान असताना मामाच्या घरी भायखळा येथे आल्या असताना सुभेदार रामजी आंबेडकरांच्या दृष्टीतक्षेपात पडल्या व त्याचक्षणी त्यांनी आपला मुलगा भीमराव या करता पसंद केली इथपासून ते रमाईच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनेक दुःख पचवत, अनेक संकटांना तोंड देत तडजोडी करत जीवन जगत असताना आंबेडकर घराण्याची सून म्हणून बाबसाहेबांच्या पाठीशी हिमालया सारख्या उभ्या राहून त्यांना साथ देत त्यांच्या जडणघडणीत मोठी साथ दिली आज माता रमाईच्या त्यागामुळेच आपणांस हे सुंदर व सुखमय जीवन जगायला मिळत आहे अश्या अनेक आठवणी व प्रसंगांना उजाळा देत त्या सर्वांसमोर मांडल्या त्यावेळी उपस्थित अनेक महिलांचे डोळे आपसूक पाणावले. तसेच बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे यांनी ही प्रगल्भ शैलीत माता रमाईच्या जीवनातील अनेक घटनांवर प्रकाश टाकत त्यांचा त्याग, धैर्य, निस्वार्थी वृत्ती, बाबासाहेबांवरील निष्ठा यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमास समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष, विश्वस्त, पतपेढीचे अध्यक्ष किशोरजी मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी ही आपले विचार व्यक्त केल्या, विश्वस्त गोविंद तांबे, राजाभाऊ उर्फ रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, गजानन तांबे, महिला आघाडी अध्यक्षा सुशीलाताई जाधव, प्रमिलाताई मर्चंडे, उपाध्यक्षा सुजाता पवार, रेश्मा जाधव तसेच अनेक शाखांतील महिला विशेष म्हणजे शिवडी गटक्रमांक १३ च्या शाखा क्र. ५७८च्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी संस्कार समितीचे बौद्धाचार्य अशोक कासारे यांना अमरावती धम्म परिषदेत धम्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानिमित्ताने माता रमाईच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून मंगेश पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.













