परवानगीशिवाय शाळा चालवली; ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलविरोधात पालक आक्रमक

0
1

पालकांची मोठी फसवणूक, CBSE मान्यतेशिवाय प्रवेश घेतल्याचा आरोप

सुस येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलने आवश्यक सीबीएसई (CBSE) मान्यता नसतानाही प्रवेश प्रक्रिया राबवून शाळा सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. रविवारी सकाळी पालकांना अचानक बोलावून झालेल्या बैठकीत शाळेने ही माहिती दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. शाळेच्या या अनपेक्षित घोषणेमुळे शेकडो पालकांनी तातडीने शाळेसमोर जमून जोरदार निषेध केला.

शाळेने पालकांना तीन पर्याय दिले:

  • आपल्या मुलांना हिंजवडी येथील ऑर्चिड शाखेत स्थलांतरित करणे
  • ऑनलाइन वर्गात शिक्षण घेणे
  • संपूर्ण फी व्याजासह परत घेऊन प्रवेश रद्द करणे

परंतु बहुसंख्य पालकांनी यापैकी कुठलाही पर्याय नाकारत शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

पहिलीच्या विद्यार्थ्याच्या एका पालकांनी सांगितले, “शाळेकडून वारंवार सांगितलं गेलं की CBSE मान्यता मिळणारच आहे. मुख्याध्यापिका रेखा पी यांनी देखील याची हमी दिली होती, त्यामुळेच आम्ही ₹1.25 लाख फी भरली. आता शाळा उद्या सुरू होणार असताना सांगतात की ४५ दिवसांनीच मान्यता मिळेल!”

दुसरी एक पालक, रिंकुकुमारी चौरसिया, म्हणाल्या, “शाळा उद्या सुरू होणार आहे. अशावेळी दुसरीकडे प्रवेश घेणं अशक्य आहे. सर्व शाळांमध्ये प्रवेश संपलेत. आता एक वर्ष वाया जाणार.”

पालकांच्या मते, शाळा गेल्या दोन वर्षांपासून वेळकाढूपणा करत होती. दोन महिन्यांत मान्यता येईल असे सांगितले गेले, नंतर सहा महिने, आणि आता पुन्हा ४५ दिवस. दरम्यान, फी भरताना कोणतीही मुभा देण्यात आली नाही, पण आता शाळा मात्र वेळ मागते आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

जेव्हा मुख्याध्यापिका रेखा पी यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी कोणतेही उत्तर न देता संवाद टाळला. पालकांचा आरोप आहे की काही पालकांना शाळेच्या मान्यता प्रक्रियेबाबत आधीच सांगण्यात आले, तर बऱ्याच जणांना फसवण्यात आले.

शाळेच्या कायदेशीर सल्लागाराने म्हटलं आहे की, “जर ४५ दिवसांत शाळा सुरू झाली नाही, तर पूर्ण फी व्याजासह परत केली जाईल आणि विद्यार्थ्यांच्या हिंजवडीला ने-आण करण्याची व्यवस्था केली जाईल.” परंतु पालकांचा आग्रह आहे की फी दोन दिवसांत परत द्यावी आणि इतर शाळांमध्ये प्रवेश मिळवून द्यावा.

महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक महेश पळकर यांनी सांगितले, “ऑर्चिड शाळेचा प्रस्ताव शासनाकडे प्रक्रियेत आहे. शाळेला ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI)’ मिळालं आहे आणि परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे.”

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

पालकांच्या विश्वासाला तडा गेल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलने आवश्यक शासकीय मंजुरीशिवाय प्रवेश देऊन शेकडो कुटुंबांच्या शिक्षणावर घाला घातला आहे. प्रशासनाने आणि शाळा व्यवस्थापनाने या गंभीर प्रकरणात तत्काळ ठोस निर्णय घेण्याची पालकांची मागणी आहे.