पवार कुटुंबीयांनी फुटीनंतर बारामतीत येणंच टाळलं का? साहेब दादांचं सामोपचाराचं राजकारण?

0

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीयांनी बारामतीत येणं टाळलं आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे महिन्याभरात एकदाही बारामतीत आलेले नाहीत. एरवी अजित पवार दर शनिवारी बारामतीत जनता दरबार घेतात तर सुप्रिया सुळे दर आठवड्यला बारामती आणि लोकसभा मतदारसंघातील गावांचे दौरे करत असतात. शरद पवार देखील नियमितपणे गोविंद बागेत येत असतात. मात्र कार्यकर्त्यांमधे दुफळी निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंकडून बारामतीत येणं टाळलं जात आहे. आपल्या वाटा आता वेगळ्या झाल्यात, असं बाहेर सांगणारे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आतून मात्र सामोपचाराचं राजकारण करताना दिसत आहेत.

बारामतीच्या लोकांशी असलेला थेट संपर्क हे पवार कुटुंबियांच्या मागील साठ वर्षांच्या यशाचं गमक राहिलं आहे. राजकारणात कितीही व्यस्त असले आणि कोणत्याही पदावर असले तरी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीतील लोकांना सतत भेटत आलेत. दर शनिवारी अजित पवारांचा जनता दरबार आणि सुप्रिया सुळेंचा मतदारसंघाचा दौरा हा इथला शिरस्ता बनून गेला आहे. शरद पवार पवार देखील किमान पंधरा दिवसातून एकदातरी गोविंदबागेत मुक्कामाला येत असतात. मात्र जेव्हापासून पक्षात फूट पडलीय तेव्हापासून बारामतीत फिरकलेलं नाही.

बारामतीच नाही तर पुण्यात येणंही शक्य तेवढं टाळण्याचा अजित पवारांचा प्रयत्न दिसत आहे. उपमुख्यमंत्री बनल्यानंतर अजित पवार फक्त प्रोटोकॉल पाळण्यासाठी पुण्यात आले आहे. एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी आणि दोनवेळा अमित शहांच्या दौऱ्यावेळी तर एकदा जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते पुण्यात आले. खरं तर जेजुरीपासून बारामती अगदीच जवळ आहे. मात्र तरीही अजित पवारांनी बारामतीत येणं टाळलं आहे. एरवी पहाटेपासून बारामतीतील लहान – मोठ्या विकास कामांची पाहणी करणाऱ्या अजितदादांकडून याआधी असं कधीच घडलेलं नाही.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अजित पवारांकडेच बारामतीचा एकहाती कारभार’
शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणल्यावर बारामतीचा कारभार त्यांच्यावर सोपवला. पुढे सुप्रिया सुळे जरी राजकारणात आल्या तरी बारामतीतील पक्षाचं काम असेल, प्रशासकीय कामे असतील किंवा लोकांची कामे असतील हे अजित पवारच बारामतीचा कारभार एकहाती पाहत आले. त्यामुळं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना बारामतीत लक्ष घालण्याची गरजही कधी वाटली नाही. रोहित पवारांनी देखील त्यांच्यासाठी कर्जत – जामखेड हा वेगळा मतदारसंघ निवडला. त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांचा कल अजित पवारांकडे असणं साहजिक आहे.

दोन जुलैला अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ दिग्ग्ज नेत्यांनी राज्यसरकारामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शरद पवार पुण्यात होते. दुसऱ्या दिवशी ते कराडला गेले आणि भाजप विरुद्ध राजकीय संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. मुंबईत झालेल्या मेळाव्यात अजित पवारांसह छगन भूबाळांनी देखील शरद पवारांवर टीका केली. मात्र त्यानंतर याच नेत्यांनी दोनवेळा त्यांची भेट घेऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण या भेटींनी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला .

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय? की…
राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? राष्ट्रवादीचे दोन्ही गट निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात खरंच लढतील का? आणि ही फक्त तात्पुरती तडजोड आहे का?, असे प्रश्न फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या नाही तर सर्वांच्याच मनात आहेत. अजित पवार गटाला हा संभ्रम हवा आहे. मात्र शरद पवारांनी हा संभ्रम दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात दौरे करायचं ठरवलंय. भुजबळांच्या येवला मतदारसंघातून त्यांनी त्याची सुरुवात देखील केली आहे. मात्र स्वतःच्या बारामतीत येणं त्यांनी टाळलं आहे. पक्षात जरी फूट पडलेली असली तरी कुटुंबातील संबंध बिघडू नयेत आणि नातेसंबंधांमध्ये विखार येऊ नये याची खबरदारी दोन्ही बाजूंकडून घेण्यात येत आहे.

शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रच’
राष्ट्रवादीतील हेच सामोपचाराचं राजकारण संसदेत देखील दिसून आलं. दिल्ली सेवा विधेयकावरून संसदेत जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा पक्षाने कोणताही व्हीप बाजवला नाही. अजित पवार गटात असलेले प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे खासदार यावेळी संसदेत अनुपस्थित राहिले. यामुळं संसदेच्या पटलावर राष्ट्रवादी एकसंध आहे, असं चित्र दिसलं. या अशा भूमिकांमुळे राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल संशय घेतला जात आहे. बारामतीतील नागरिकांच्या मते तर शरद पवार आणि अजित पवार हे एकच असून ते कधीही एकत्र येऊ शकतात.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

...तोपर्यंत संभ्रम कायम!
जोपर्यंत पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांबद्दल टीका करणार नाहीत तोपर्यंत बारामतीच्या पवारांच्या मतदारांच्या मनातील ही भाबडी आशा कायम राहणार आहे. अर्थात बाहेर कितीही टोकाचा राजकीय संघर्ष झाला तरी बारामतीत तो होऊ द्यायचा नाही हे शाहनपण राष्ट्रवादीचे दोन्ही गट दाखवताना दिसत आहे आणि त्याचसाठी बारामतीत येणं शक्य तोवर टाळलं जातं असल्याच्या चर्चा आहे.

शरद पवारांच्या पुढच्या चालीकडे सगळ्यांचं लक्ष
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते यांच्यामध्ये कमालीची कटुता निर्माण झाली. दिवसेंदिवस त्यातील विखार वाढत गेला. मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूंनी अजूनपर्यंत तरी तो टाळला आहे. अजूनही दोन्ही बाजू एकमेकांना आपलंच कसं बरोबर आहे?, हे सांगण्याचा, पटवून देण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात शरद पवारांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु झाल्यावर हे चित्र बदलणार आहे आणि दोन गटांच्या वाटा पूर्णपणे वेगळ्या होणार आहेत. अशावेळी बारामतीत काय चित्र असेल ? पवार विरुद्ध पवार असा सामना होईल की इथेही सामोपचाराने मार्ग काढला जाईल ? यामुळं शरद पवारांच्या पुढच्या चालीकडे सगळ्यांचं लक्ष असेल.