मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील घोटाळ्याची चौकशी करता आहात तर पीएम फंडाची देखील चौकशी करा, अशी मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एका वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर टीका करताना ही मागणी केली. त्याचबरोबर राज्यातील राजकीय परिस्थितीवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. ठाकरे म्हणाले, “अनेकांना आता मुख्यमंत्री व्हायचं आहे. पण ही पदं येतात आणि जातात पण माणूस म्हणून जी काही आपली ओळख असते ती फार महत्वाची असते. त्या ओळखीचा उपयोग आपण आपल्याला मिळालेल्या पदाला कसा करुन देतो हा महत्वाचा भाग असतो. हल्ली ज्यांना ज्यांनी घडवलं त्या शिल्पकारांना पळवण्याचा प्रकार सुरु झाला आहे. म्हणजे स्वतःच कर्तुत्व काही नसतं पण स्वतः तर शिल्पकार होऊच शकत नाही. पण ज्यांनी घडवलं आहे, तोच पळवून न्यायचा. आत्ताचं राजकीय वातावरण खूपच विचित्र झालं आहे. पूर्वी अनेकांना देशासाठी सोसलं म्हणून आपण आज सुखानं राहू शकतो”






“ज्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता अशी विचारसरणी आज देशाला आपल्या कवेत घेऊ इच्छिते. आणीबाणीनंतर आपल्याविरोधात प्रचार करणाऱ्यांनाही वेळ दिला गेला होता, ही एक प्रकारे लोकशाहीच होती. पण आत्ता जे काही चाललंय की काही बोलायचंच नाही बोललं की तोंडच बंद करुन टाकायचं”
मुंबईला बदनाम का करता?
मला प्रशासनाचा काहीच अनुभव नव्हता. एक मुख्यमंत्रीपद सोडलं तर मी कुठलंच खातं सांभाळलेलं नाही. पण माझ्या संकटाच्या काळात काँग्रेसची अनुभव संपन्न लोक मला सहकारी म्हणून मिळाली.
कोरोना काळात मी एकटाच लढत होतो असं नाही हे सर्वच जण लढत होते. मला खंत एकाच गोष्टीची वाटते की, कोविड काळातील भ्रष्टाचार काढा जरुर काढा पण संपूर्ण जग कोरोनानं ग्रासलेलं असताना मुंबईनं एक आदर्श जगासमोर ठेवला काय करु शकतो आणि काय केलं पाहिजे. पण जग कौतुक करत असताना मोठं हृदय लागतं. पण आपल्यातला माणूसच मेला असेल तर तुमच्याकडून कौतुकाची अपेक्षाच नाही. पण कौतुक केलं नाही तरी बदनाम का करता?
मग पीएम केअर फंडाची चौकशीही करा
बदनाम करताना मुंबई महापालिकेतील कोविड काळातील गैरकारभाराची चौकशी करणार आहात तर देशातील सर्व सरकारांची पूर्णपणे चौकशी करा. कोविड काळातील तुम्ही ससेमिरा लावून चौकशी करणार असाल तर मग पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा. कारण जनतेला हा पैसा गेला कुठे हे कळलं पाहिजे. कारण इथं पैसा आला कुठून होता आणि गेला कुठं हे कळायला नको. कारण हा पण एक घोटाळा होऊ शकतो, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.













