आम्ही महापालिका निवडणुकीस तयार पण विलंबास राष्ट्रवादीच कारणीभूत; बावनकुळे यांची थेट टीका

0

पुणे: ‘‘महापालिका निवडणूका घेण्यास भाजप -शिवसेना आजही तयार आहे,’’ असे सांगून ‘‘ महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणूकांना उशीर होत आहे,’ अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणूकांच्या विलंबाचे खापर राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गुरूवारी फोडले. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठकीसाठी बावनकुळे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी भाजप कार्यसमितीच्या बैठकीतील विषयांपासून ते महाविकास आघाडी सरकाराने केलेला गैरकारभार, कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीतील पराभव, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांपासून ते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, प्रदीप कुरूलकर यांची अटक, त्रिबकेश्‍वर येथील वाद यांच्यासह विविध विषयांवर पक्षाची सविस्तर भूमिका मांडली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टिकेबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले,‘‘ किंचित सेनेतील नेते मंडळी सोडून जातील या भितीनेच मुंबईत कोणी भाजपचे नेते आले कि राऊत टीका करतात.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मुंबई महापौर आमचाच होणार, यांची मर्जी त्यांना झोंबली असावी,’’ असा टोला राऊत यांना मारून महापालिका निवडणूकांबाबत ते म्हणाले,,‘‘ जो पर्यंत नवीन जनगणना होत नाही, तो पर्यत सदस्य संख्या आणि प्रभाग रचना वाढवता येत नाही.

परंतु महाविकास आघाडी सरकारने नियमबाह्य काम करीत लोकसंख्या वाढवून प्रभाग रचना तयार केली. त्यांच्या नेत्यांनीही ते मान्य केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ती रद्द केले. ती रद्द केली म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस न्यायालयात गेले. त्यामुळे निवडणूकांना विलंब होत आहे. आम्ही आजही निडणूका घेण्यास तयार आहोत. जेव्हा केव्हा निवडणूका होतील, तेव्हा संजय राऊत यांना नड्डा यांचा प्रवास किती महत्वाचा होता हे कळेलच.’’

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कुरूलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधाबाबत बावनकुळे म्हणाले,‘‘ पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी. त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही.

जी व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर तो गुन्हेगार आहेत. त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. कोणत्या तो धर्माचा आहे किवा जातीचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही’’ यावेळी मात्र कुरूलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे का, या प्रश्‍नांला बावनकुळे यांनी उत्तर देणे सोईस्करपणे टाळले.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

तर पुणे लोकसभा निवडणूकासंदर्भात निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता त्यावर बोलण्यावर काही अर्थ नाही, असे सांगून त्यांनी बगल दिली. कार्यसमितीच्या आज होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी, सिलेंडरमध्ये झालेली दरवाढ कमी करावी, या संदर्भातील ठराव मांडणार का,असा प्रश्‍न विचारला असता बावनकुळे म्हणाले, ‘‘ हा प्रश्‍न अंतराष्ट्रीय बाजाराशी निगडीत आहे. कर्नाटक सरकार निवडणूका जिंकण्यासाठी कॉंग्रेसने अशी अनेक आश्‍वासन दिले. ते पूर्ण करण्यासाठी तेवढे बजेट तरी त्यांच्याकडे आहे का,’’ असे कारण देत थेट उत्तर देणे टाळले. तर भाजपचा मुख्यमंत्री असावा असा ठराव मांडणार का,‘ या प्रश्‍नांवरही त्यांनी भाष्य करणे टाळले.