पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबईतून नवा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. आजची बैठक नेमकी कशासाठी होती ते लवकरच समजेल, असंही बाबू वागस्कर म्हणाले आहेत. “चार ते पाच दिवसात राज ठाकरे मुंबईतून नवा निर्णय जाहीर करतील. आजची बैठक अचानक नेमकी कशासाठी होती ही लवकरच तुम्हाला कळेल. पण पक्ष बांधणीसाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली. काही दिवसांनी तुम्हाला कळेल की बैठकीत काय ठरलं आणि नवीन काय होईल”, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली.
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे ते आज पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल झाले. राज ठाकरे मुंबईवरुन निघून थेट पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राज ठाकरेंनी लगेच पुणे शहरातील सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. राज ठाकरे अचानक पुण्यात दाखल झाल्याने पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. विशेष म्हणजे राज ठाकरे पुणे मनसे कार्यालयात असताना शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते बाबू वागस्कर हे पुणे महापालिकेत गेले होते.
मनसे-भाजप एकत्र येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टात लवकरच राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय दुसरीकडे भाजप आणि मनसेचीदेखील जवळ गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होईल का? याबाबत लवकरच स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.