पुणे शहर पोलिस दलाच्या २०२४-२५ च्या भरती प्रक्रियेत पोलिस शिपाई, वाहनचालक, बँडस्मन आणि कारागृह शिपाई पदाच्या सुमारे दोन हजार जागांसाठी दोन लाख १९ हजार ९२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे शहर पोलिस दलात यंदा आत्तापर्यंतची सर्वांत मोठी भरती होत आहे. यात १७३३ पोलिस शिपाई, १०५ वाहनचालक, ३३ बँडस्मन आणि कारागृह विभागातील १३० शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु ती सात डिसेंबरपर्यंत वाढविली होती. या पदांसाठी दोन लाख १९ हजार ९२७ अर्ज प्राप्त झाले आहेत.






राज्यात एकाच दिवशी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिस शिपाई पदासाठी उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असल्यास त्यांना एकाच ठिकाणी हजर राहावे लागणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना शहराची निवड करावी लागेल.
अर्जांची पडताळणी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. कारागृह शिपाई पदाची भरती पुणे पोलिसांकडूनच घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा घेणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरतीची पुढील प्रक्रिया प्रत्यक्षात नेमकी कधी सुरू होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
पोलिस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान मैदानावर सीसीटीव्ही आणि प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावणार आहेत. फसवणूक टाळण्यासाठी उमेदवारांनी खोटे आश्वासन आणि भूलथापांना बळी पडू नये. पोलिस आयुक्त कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.
– संजय पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन)













