तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आरोपीच भाजप नगराध्यक्षपदी उमेदवार, जामीनावर बाहेर येताच पडल्या पक्षीय पायघड्या

0

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालघर साधू हत्याकांड प्रकरणात ज्याच्यावर आरोप केले त्यालाच पक्षात घेतल्यानं विरोधकांच्या टीकेचा सामना भाजपला करावा लागला होता. शेवटी प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय भाजपने घेतला. दरम्यान, आता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या विनोद गंगणे यालाच भाजपने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याचं समोर आलंय. आता या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दुसरीकडे भाजपने तुळजापूर ड्रग्ज प्रकरण समोर आणण्यासाठी विनोद गंगणे याची मदत झाल्याचा दावा करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षीय पायघड्या घालण्याचे काम केले आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी विनोद गंगणे हा आरोपी आहे. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. ड्रग्ज प्रकरणी विनोद गंगणेला तुरुंगातही पाठवण्यात आलं होतं. त्याच विनोद गंगणेला भाजपनं थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केलीय. याआधी भाजपने याच प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या संतोष परमेश्वर यालाही पक्षात घेतलं होतं. संतोष परमेश्वर हा माजी नगराध्यक्ष होता. त्याच्या प्रवेशानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीका झाली होती. भाजपकडून आरोपींना पाठीशी घातलं जातंय आणि भाजप तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

भाजपने विनोद गंगणेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ड्रग्ज प्रकरणातला आरोपी लोकप्रतिनिधी होणार का? असा सवाल करत महायुती सरकारची वॉशिंग मशीन कमाल करतेय. आधी भ्रष्ट लोकांना पवित्र करायची आणि आता ड्रग्ज प्रकरणी तीन महिने तुरुंगात गेलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जातेय. गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे असंही वडेट्टीवार यांनी विचारलंय.