सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर आय २० कारमध्ये स्फोट झाला. या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही अन् वेगात तपास केला जात आहे. पोलिसाना तपासावेळी नवा धागा सापडला आहे. आय २० कार स्फोटाआधी तब्बल ३ तास एकाच जागी पार्किंगमध्ये उभी होती. या कारचे पार्किंगमधील फोटो सध्या समोर आले आहेत.






देशाची राजधानी दिल्लीमधील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वर कारमध्ये भीषण स्फोट झाला. आय २० या कारमध्ये सायंकाळी 6.52 वाजता भयंकर स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. या प्रकरणी पोलिसांकडून आय २० ट्रक केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
सोमवारी नेमकं झालं काय?
सोमवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास आय-२० कार दर्यागंज मार्केट परिसरातून निघताना दिसली. त्यानंतर ती सुनहेरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये पोहोचली. त्यानंतर सायंकाळी 6.22 वाजताच्या सुमारास पार्किंगमधून कार छट्टा रेल चौकात यू-टर्न घेत लोअर सुभाष मार्गाकडे जातानाही कॅमेऱ्यांनी कैद केली. छट्टा रेल चौकात यू-टर्न घेतल्यानंतर, कार लोअर सुभाष मार्गाकडे जात होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, सायंकाळी 6.52 वाजता स्फोट झाला त्याआधी सिग्नलजवळ कारचा वेग कमी झाला होता.
१३ संशयितांची चौकशी
लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या तपासात पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध भागातून गोळा केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी १३ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.
स्फोटावेळी उमर कारमध्ये एकटाच होता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाल किल्ल्यावरील कार बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी उमर मोहम्मद हा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. स्फोटाच्या वेळी उमर हा कारमध्ये एकटाच होता. या दहशतवादी कटामागील घटनांक्रम समोर येईल. तपास यंत्रणाकडून उमर याच्या हालचाली अन् संपर्क कुठे कुठे केला? याची संपूर्ण चौकशी कऱण्यात येत आहे.
स्फोटकांचा तपास
राजधानी दिल्लीमधील विशेष कक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने फरिदाबाद गुन्हे शाखा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून तेथे सापडलेल्या स्फोटकांबद्दल माहिती मागवली आहे. प्राथमिक तपासात अमोनियम नायट्रेटचे अंश आढळून आले आहेत. पण एफएसएल अहवाल आल्यानंतरच स्फोटकाचे नेमके स्वरूप कळेल. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा पहिला अहवाल आज दुपारी १२ वाजेपर्यंत प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर तपासाला दिशा मिळणार आहे.












