मुंढर दि. ७ (रामदास धो. गमरे): ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील वळवणवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहिरीजवळ श्रमदानातून विजय बंधारा बांधण्यात आला. शासनाच्या “पाणी आडवा, पाणी जिरवा” या धोरणाला अनुसरून आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “पाणी स्रोत बळकटीकरण” या उपक्रमाचा हा एक भाग आहे.






मुंढर खुर्द, वळवण आणि आडीवाडी या परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसोबत एकत्र येऊन श्रमदानातून हा बंधारा उभारला. या बंधाऱ्यामुळे नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीपातळी वाढून ग्रामस्थांना वर्षभर पुरेशा पाण्याचा लाभ मिळणार आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही या बंधाऱ्यामुळे उपलब्ध झाली आहे.
या कार्यात सरपंच सौ. आमिषा गमरे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, पोलिस पाटील किरण धनावडे, वळवणवाडी अध्यक्ष अशोक गोणबरे, आडीवाडीतील प्रकाश मोरे, अनिल अवेरे, मदन धनावडे, प्रभाकर मोहित, यशवंत मोहित, तुकाराम पास्टे, रामचंद्र चांदीवडे, भरत मोरे, शांताराम जोगळे, अनंत सुवरे, करण गोणबरे, सचिन चाळके तसेच अंगणवाडी सेविका लता गोणबरेव उर्मिला बाईत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
ग्रामस्थांच्या एकत्रित श्रमदानातून साकारलेला हा विजय बंधारा ग्रामीण पातळीवर जलसंधारणाची चळवळ बळकट करणारा ठरत असून, “स्वावलंबी ग्रामविकास” या संकल्पनेला दिशा देणारा ठरला आहे.













