मुंबई दि. ७ (रामदास धो. गमरे) “आरएसएस ही ब्राम्हणी विचारधारा मांडणाऱ्या समूहाची संघटना असून तिने आज सत्तेच्या केंद्रस्थानी आपल्या विचारधारेचे अधिष्ठान बसवून देशाला परिपूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली ठेवून सत्ता, प्रणाली, न्यायव्यवस्था, निवडणूक मंडळ, साधन संस्था हे सर्वच हस्तगत केलं आहे. देशात दलित, मागासवर्गीय व बोद्ध यांची लोकसंख्या अधिक असली तरी आज ते संघटित नसल्यामुळे व गटातटात विभागले गेल्यामुळे आज ते सत्तेपासून कोसो दूर आहेत म्हणून आपणही संघटित होऊन सत्तेच्या केंद्रस्थानी आपले कार्यकर्ते पोहोचवले पाहिजेत वेळेचे भान ठेवून आपण आताच विचार केला नाही तर भविष्यात आपण पुन्हा सत्तेत येणं मुश्किल होईल व देशाचे राजकिय चित्र बदलले असेल म्हणून आलेल्या संधीचे सोन करीत आपण येनकेन मार्गाने सत्तेत सहभागी झाले पाहिजे, कारण बौद्धजन पंचायत समितीच्या मुशीत वाढलेल्या आणि घडलेल्या कार्यकर्त्याला संधी भेटली तर तो नक्कीच राजकारणाचं मैदान गाजविल्याशिवाय राहणार नाही व सोबतच तो समाजाच हित जपेल, म्हणूनच मी शिंदे गटासोबत युती करून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक विचारधारेसोबत राजकिय विचारांची जोड करू पाहत आहे; माझा निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवेलं” असे प्रतिपादन सरसेनानी आनंदराज आंबेडकर बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलत असताना केले.






सभापती आनंदराज आंबेडकर आपल्या भाषणात पुढे बोलत असताना “भारतातील बाबासाहेबांच पहिलं स्मारक लहान होत म्हणून मोठं स्मारक बनविण्यासाठी आपण कंबर कसली व जिद्द न सोडता शाखा शाखांवर एक लाख रुपये निधी आकारून सुयोग्य आराखडा तयार करून कामकाजाला सुरवात केली त्यावेळी मी कार्याध्यक्ष पदाचा भार सांभाळीत होतो व माझे सहकारी दिवंगत सभापती प्रा. रमाकांत यादव म्हणाले की लोक दहा रुपये वर्गणी असतानाही ती चार चार वर्षे दहा रुपये वभरत नाहीत ते लाख रुपये जमा करतील का ? परंतु मला बाबासाहेबांच्या विचारांवर व बाबासाहेबांसाठी तन, मन, धन अर्पण करणाऱ्या बाबासाहेबांच्या निष्ठावंत लेकरांवर विश्वास होता व वेळप्रसंगी आतड्याला पीळ देऊन त्याच लेकरांनी लाखो रुपयांचा निधी उभा केला व तुमच्याच ताकदीच्या पाठींब्यावर आपण मोठं स्मारक उभारू शकलो ज्याच लवकरच उदघाटन होणार आहे तसेच इंदूमिलची १२ एकर सरकारी जागा ताब्यात घेण्याचा आपण प्रयत्न करत होतो त्यावेळी लोकांनी आपली खिल्ली उडवली परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कार्य करत राहिलो व मोठा संघर्ष उभारून विरोधकांच्या नाकावर टिच्चून आपण आपल्या मनगटाच्या ताकदीवर इंदूमिलची जागा ताब्यात घेतली आज तिथेही जलदगतीने काम सुरू आहे, आपण जर प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे आपण वेळोवेळी सिद्ध केलं आहे, जगाच्या इतिहासात पाण्याला आग लावण्याचं काम फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते त्याच बाबासाहेबांचे आपण वैचारिक वारसदार आहोत, २०२७ साली चवदार तळे सत्याग्रहाचे १०० वे वर्ष आहे तरी हा शतकोत्सव आपण जागतिक स्तरावर देश विदेशातील मान्यवरांना निमंत्रण देऊन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा आराखडा तयार करत आहोत तो देखील तुम्ही यशस्वी कराल याची मला खात्री आहे, म्हणून शाखा शाखांतून सर्वांनी कामाला लागा येणाऱ्या १ जानेवारी पासून आपण कामाला सुरुवात करणार आहोत” असा संदेश ही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सदर प्रसंगी “बौद्धजन पंचायत समितीची ध्येय आणि धोरणे” यावर आपले विचार मांडत असताना सरचिटणीस राजेश घाडगे “२००९ पासून मा. आनंदराज आंबेडकर यांनी समितीच्या कामकाजाची सूत्र हाती घेतला नंतरच वैविध्यपूर्ण असे बदल होऊन बौद्धजन पंचायत समितीने कात टाकली समितीच्या कार्याचा आलेख उंचावला गेला पूर्वी ८ ते १० उपसमित्या होत्या परंतु आनंदराज आंबेडकर साहेब आल्यानंतर त्यांनी १५ उपसमित्या स्थापन करून कामकाजाची नवीन घडी बसवली. शैक्षणिक क्षेत्रात परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन देणे, समाज आर्थिकदृष्ट्या सधन होण्यासाठी पतपेढीला आर्थिक बळकटी देऊन त्यामाध्यमातून स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांना कर्जस्वरूपात मदत, गरजूंना वैद्यकीय मदत व धम्मप्रचार व प्रसारासाठी बौद्धाचार्य घडविण्यासाठी श्रामणेर शिबिर, वर्षावास प्रवचन मालिकेसारखे उपक्रम राबविणे, वधू-वर मेळावामार्फत समाजातील मुला मुलींची लग्ने जुळवणे, अनाथआश्रम, दुर्गम भागातील विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप अश्यावेळी योग्य मदत करणे अशी विविध कार्ये या उपसमित्यांच्या मार्फत करण्यात येतात.” असे महत्वाचे मुद्दे अधोरेखित करीत नमूद केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या पहाडी आवाजात प्रभावी भाषाशैलीत केले तर मंगेश पवार यांनी मुद्देसूद पद्धतीने प्रस्ताविक सादर केले. त्याचसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दोन लाखाचा धम्मदान स्वरूपातील योगदानमूल्य धनादेश बौद्धाचार्य संस्कार समितीच्या वतीने मा. सभापती आनंदराज आंबेडकरांकडे सुपूर्द करण्यात आला. तद्नंतर समितीच्या सर्वच कार्यक्रमांना विविध वृत्तपत्रांमधून वेळोवेळी प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ असणारे खंदे कार्यकर्ते, शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांना सभापती आनंदराज आंबेकरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर वर्षावास प्रवचन मालिकेसाठी व श्रामणेर शिबिरासाठी ज्या ज्या लोकांनी धम्मदान, श्रमदान व इतर स्वरूपात मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करून त्या सर्वांनाही सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चिटणीस लवेश तांबे, अनिरुद्ध जाधव, श्रीधर जाधव, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, श्रीधर साळवी, रवींद्र शिंदे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, गजानन तांबे, महेंद्र पवार, सुरेश मंचेकर, कंत्राटदार महेंद्र कांबळे, अतुल साळवी, तुकाराम घाडगे, तुळशीराम शिर्के, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, राजेश पवार, भगवान साळवी, दर्शन जाधव, आनंद मोहिते, पत्रकार गुणाजी काजिर्डेकर, दर्शन जाधव, गोवा राज्याचे गटप्रतिनिधी विकास गायकवाड, बौद्धाचार्य महेश्वर साळवी, महिला मंडळाच्या सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सर्व सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.













