महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यंदाही विजयादशमी निमित्त दिनांक २ ऑक्टोबर रोजी भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ११ वे वर्ष असून रावण दहन कार्यक्रमासोबत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष सत्कार तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग सत्संगाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजक व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांनी दिली.






कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी येथील स्वातंत्र्य वीर सावरकर मैदानात भव्य रावण दहन सोहळा सायंकाळी ७ वाजता होणार असून या कार्यक्रमास पालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, राज्याचे ऊर्जा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळयात भारताचे पहिले पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलिकांत राजाराम पेटकर, राष्ट्रीय मोटोक्रॉस खेळाडू रूग्वेद बारगुजे,राष्ट्रीय एथलेटिक खेळाडू मानसी भरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सत्संग, प्रसिध्द गायक राजेश दातार यांचे गीताचा कार्यक्रम व अत्याधुनिक फायर शो यावेळी होणार आहे.
हरियाणातील कलाकार हनुमानाच्या वेशभूषेत
या कार्यक्रमात रावण दहना सोबतच ,लहान मुलांचे विशेष आकर्षण असलेल्या हरयाणा हिसार येथील कलाकार हनुमानाच्या वेशभुषेत उपस्थित राहणार असून पुण्यात प्रथमच ‘कथा शौर्याची, माझ्या श्रीरामाची’ ही लघु नाटिका सादर होणार आहे. प्रभु श्रीराम वेशभूषेतील कलाकार व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रावण दहन करण्यात येणार असून यावेळी अत्याधुनिक फायर शो होणार असल्याचे आयोजक प्रशांत कनोजिया यांनी सांगितले.











