मुंबई दि. २९ (रामदास धो. गमरे) “प्रज्ञा म्हणजे फक्त बुद्धिमत्ता किंवा पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रज्ञा म्हणजे सत्य आणि असत्य यामधील सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता, सुज्ञपणे विचार करून कृती करण्याची योग्यता आहे, जी केवळ पुस्तकी माहिती नसून ती अनुभव, अंतर्ज्ञान आणि सद्विवेक बुद्धी यांचे एकत्रित असे मूर्तरूप आहे. भगवान बुद्धांनी सांगितले आहे की दुःखाची खरी मुळे लोभ, द्वेष आणि मोह यात आहेत. या त्रिविकारांवर मात करण्यासाठी शील, करुणा आणि प्रज्ञा या तीन गोष्टींचा आधार घ्यावा लागतो; त्यापैकी प्रज्ञा आपल्याला अज्ञानाचा नाश करून वस्तुस्थितीचे खरे आकलन करून देते. व्यवहारातही प्रज्ञेचे मोठे महत्त्व आहे कारण ती आपल्याला विवेक देते, योग्य-अयोग्य ठरवण्याची ताकद देते, आपला प्रत्येक निर्णय लोभ, स्वार्थ आणि अहंकार यावर आधारित न घेता तो सत्य, तर्क आणि करुणा यांच्या आधारे घ्यावा हे प्रज्ञा आपल्याला शिकवते म्हणूनच प्रज्ञा ही फक्त एक संकल्पना नाही तर ती अनुभवातून जन्मलेली जाणीव आहे, जी आपल्याला आयुष्य योग्य दिशेने नेते आणि खरी समृद्धी देते” असे प्रतिपादन प्रविण गजानन मोरे यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास मालिकेचे तेरावे पुष्प गुंफत “प्रज्ञा, शील, करुणा” या विषयावर बोलत असताना केले.






बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे तेरावे पुष्प उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले प्रस्ताविक सादर करते वेळी त्यांनी आदर्श बौद्धाचार्य, पाली भाषेतील एम.ए. व पेशाने वकील असलेल्या प्रवचनकार प्रविण मोरे यांची सभागृहाला ओळख करून दिली, सोबतच स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्या यांनी सढळ हस्ते धम्मदान करीत आपली मदत ऑक्टोबर पर्यंत जमा करावी असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांनी प्रवचनकार प्रविण मोरे यांनी “प्रज्ञा, शील, करुणा” या विषयावर बोलत असताना अत्यंत मुद्देसूद मांडणी करीत प्रज्ञा, शील, करुणा योग्य विवेचन करीत त्याचे मानवी आयुष्यातील महत्व सर्वसामान्यांनाही समजेल इतक्या साध्या व सोप्या परंतु प्रभावी भाषेत सौंदहरणासह विशद केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीस मंगलकामना दिल्या. सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार यांनीही सभागृहाला संबोधित करून “प्रज्ञा, शील, करुणा” या विषयावर आपले अमूल्य असे विचार व्यक्त केले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत सरचिटणीस राजेश घाडगे, पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर मोरे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेश शिवराम पवार, महेंद्र कांबळे, धृपद मोरे, मिलिंद जाधव, मंगेश जाधव, दर्शन कांबळे, संतोष सावरकर, संदेश गमरे, तुकाराम घाडगे, माजी चिटणीस, अंजलीताई मोहिते, सचिव सावी, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, प्रवचनकार प्रविण मोरे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.












