मुंबई दि. (रामदास धो. गमरे) “त्यागमूर्ती माता रमाईच्या अकस्मात जाण्याने व्यथित झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकाकी पडले होते त्या दुःखातून बाहेर येतो न येतो त्यांच्या समोर समाजाच्या उध्दार करण्याच्या कामाचा मोठा डोंगर उभा होता त्यातच मंत्रिपदाच्या कामाचा व्याप, संविधान निर्मितीचे कार्य, वाचन, चिंतन अश्या अनेक गोष्टींच्या व्यापात असल्याने बाबासाहेबांना वेळेवर जेवण व पुरेशी झोप घेता येत नसे त्याचाच दुष्परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला व त्यांचे शरीर विविध प्रकारच्या आजाराने ग्रसित झाले, बाबासाहेब धैर्य, चिकाटी, आत्मविश्वासाने पुढे जात असले तरी आतून त्यांचे शरीर विविध व्याधींनी पोखरून काढलं होत अश्या अवस्थेत दिल्ली दौऱ्याहुन परतल्यावर विलेपार्ले येथील डॉ. विश्वासराव या तज्ञ डॉकटरांची त्यांनी औषधोपचार व सल्ला घेतला त्यांनीही त्यांच्या पुढील उपचारासाठी गिरगावात राहणाऱ्या निष्णात फिजिओथेरपिस्ट व नामवंत डॉक्टर मालवणकरांना भेटण्याचा सल्ला दिला.






डॉ. मालवणकरांनी बाबासाहेबांच्या सर्व आवश्यक तपासण्या करून त्यानुसार त्यांनी औषधोपचार सुरू केले त्या उपचारांनी बाबासाहेबांना बराच फरक पडला म्हणून बाबासाहेब दिल्लीला जरी गेले तरी फोनद्वारे डॉ. मालवणकरांना संपर्क साधून त्यांचा सल्ल्यानुसारच औषध घेत अश्याप्रकारे जरी त्यांचे उपचार सुरू असले तरी ती औषध त्यांच्या शरीरावर काम करीत रमाईच्या जाण्याने दुःखात बुडालेल्या बाबासाहेबांच्या मनावर मात्र कोणतंही औषध लागू पडत नव्हतं. त्यातच कामाचा व्याप व व्यथित मन यामुळे अनेकदा त्यांची औषधांचे वेळापत्रक व पथ्यपाणी त्यांच्याकडून सांभाळली जात नव्हती त्यातच त्यांच्या कामकाजाचा वाढता व्याप बघता तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की बाबासाहेब आता जर तुम्हाला निरोगी आयुष्य हवे असेल तर एकतर तुम्ही एखादा चांगला जोडीदार बघून दुसरे लग्न करा किंवा आपल्या कामापासून थोडा काळ दूर जाऊन पूर्ण विश्रांती व औषधोपचार घ्यावे लागतील त्यावर बाबासाहेबांनी विचार केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या किंवा इतर समाजातही आपल्या शिक्षण, पत व सध्याच्या वयोमानाला शोभेल अशी सुयोग्य तोडीस तोड वधू दुरदूरवर तरी कोणीही नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की डॉ. मालवणकरांजवळ डॉ. शारदा कृष्णराव कबीर या आहेत ज्या समजूतदार, विनयशील व उच्चशिक्षित आहेत तसेच त्या स्वतः डॉक्टर असल्याने त्या आपल्याला शारीरिक, मानसिक स्थिती व अवस्था समजून घेतील तसेच आपले औषधोपचार व पथ्यपाणी याचाही ताळमेळ जुळवून देतील त्यामुळे बाबासाहेबांनी आपला प्रस्ताव डॉ. मालवणकरांना पाठवला डॉक्टरांनाही सदर प्रस्ताव पसंतीस पडला त्यांनी सदर प्रस्ताव शारदा यांना पाठवला त्यावेळी शारदा या द्विधा मनस्थितीत होत्या त्यांच्या घरी चार बहिणी व तीन भाऊ असा आठ भावंडांचा परिवार होता त्यातील ६ भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला होता त्यामुळे त्यांनी मोठ्या धैर्याने आपल्या मोठ्या भावाजवळ बाबासाहेबांचा प्रस्ताव मांडला त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ म्हणाला ‘म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार, अजिबात नकार देऊ नकोस’ एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला की बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांवर जीवापाड प्रेम करतात त्यात ही डॉक्टरीणबाई त्यांना नकार देते आहे हे कळलं तर डॉक्टरीण बाईची खैर नाही’, असे तो गमतीत बोलला. अखेर रात्रभर विचार करून डॉ. शारदा कबीर यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला.
त्यामागे दोन कारणे होती एक तर डॉक्टर असल्याने त्यांना बाबासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेता येईल व त्यांच्या भावंडांचाही होकार होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला, तेव्हा बाबासाहेब दिल्लीच्या १ हार्डिंग्ज ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते. तेथेच मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत १५ एप्रिल १९४८ रोजी बाबासाहेब व शारदा कबीर नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले व शारदा कबीर या सविता बाबासाहेब आंबेडकर झाल्या, माईसाहेब या मूळच्या सारस्वत ब्राम्हण परिवारातील असून रत्नागिरी जिल्ह्यातील डोर्ले हे त्यांचे गाव त्यांचा परिवार उच्चशिक्षित व पुरोगामी विचारांचा असल्याने त्या बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांच्यासोबत समरस झाल्या, निवडणुकीतील पराभवाने खचून गेलेल्या बाबासाहेबांना सावरण्यासाठी पत्नी म्हणून केलेली धडपड म्हणजे त्यांच्या निस्सीम प्रेमाचे उदाहरण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या. मराठवाडा नामांतर लढा, व रिडल्स आंदोलन यांमध्ये सविता आंबेडकरांचा सक्रिय सहभाग होता होता. अयोध्या प्रकरणातील जमीन ही बौद्धांची असल्याची याचिका त्यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केली होती. त्यांनी एससी, एसटी व बौद्धांसाठी आरक्षणाची मागणी केली होती. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनीही बौद्ध धम्म स्वीकारला. म्यानमारचे भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. अशाप्रकारे माईसाहेब या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या, सविता माई या बाबासाहेबांच्या पत्नी असल्या तरी एक डॉक्टर या नात्याने बाबासाहेबांची तब्येत सांभाळणे त्यांना वेळोवेळी औषधोपचार देणे पथ्यपाणी बघणे हे सर्व त्या अत्यंत काटेकोरपणे पाळत त्यामुळेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘द बुद्ध अँड हिज् धम्म’ किंवा ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांना ८ वर्ष अधिक जगविण्याचे श्रेय त्यांनी डॉ. सविता आंबेडकरांना दिले होते म्हणून डॉक्टर या नात्याने बाबासाहेबांना संजीवनी देऊन साथ देण्याचे कार्य सवितामाई आंबेडकरांनी केले” असे प्रतिपादन हेमंत रामचंद्र भेकरे यांनी बौद्धजन सहकारी संघ आयोजित ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेचे नववे पुष्प गुंफत असताना केले.
बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे नववे पुष्प तालुका अध्यक्ष सुरेश पवार (आबलोली) यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet app द्वारे ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर नववे पुष्पाच्या प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाच्या पेवे विभाग क्र. २ चे विभाग अधिकारी किशोर जाधव व परिवारास पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते पूजाविधी संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सचिव सचिन मोहिते यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष व तालुका अध्यक्ष सुरेश पवार यांनी “व्याख्याते हेमंत रामचंद्र भेकरे यांनी ‘सवितामाई आंबेडकर’ या विषयावर आपले विचार सरळ साध्या परंतु प्रभावीपणे सौंदहरणासह मांडून माईसाहेबांवर काही कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करून त्यांचे खरे चरित्र व समाजासाठी असलेले योगदान सर्वांसमोर आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व उपस्थितांचे आभार व्यक्त करीत आपण आजवर जशी साथ दिली ती अशीच कायम राहिली तर अजूनही उत्तमोत्तम कार्यक्रम यशस्वीपणे घेऊन धम्माचा प्रचार व प्रसार घरोघरी करता येईल” असे नमूद करीत सर्वांना मंगलकामना दिल्या.
सदर कार्यक्रमास आजी-माजी विश्वस्त, आजी-माजी मध्यवर्ती कमिटी, त्यांचे चेअरमन, आजी माजी विभाग अधिकारी, गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील सर्व सभासद, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच पेवे विभाग क्र. २ चे विभाग अधिकारी किशोर जाधव व परिवार व व्याख्याते हेमंत रामचंद्र भेकरे, गाव व मुंबई शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, उपासक, उपासिका, हितचिंतक व उपस्थितांचे आभार मानून संस्कार समितीचे सचिव सचिन मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.











